गुन्हे होतच राहतात, पोलीस महासंचालकांचे धक्कादायक विधान (व्हिडीओ)

पटणा : वृत्तसंस्था – हैदराबाद आणि उन्नाव बलात्कार प्रकरणामुळे देशात संतापाची लाट असतानाच बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी मात्र धक्कादायक विधान केले आहे. गुन्हे घडणारच नाही, असा दावा कोणीच करु शकत नाही. गुन्हे होतात आणि होतच राहणार. हा तर उंदीर आणि मांजराचा खेळ असल्याचे धक्कादायक विधान पांडे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यावर संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत.

https://twitter.com/desimojito/status/1203017397784834048

वाढत्या गुन्हेगारीबाबत पोलीस महासंचालक पांडे यांना विचारले असता ते पत्रकारावरच संतापले. तुम्ही नव्याने पत्रकारिता करत असाल किंवा तुम्हाला प्रश्न कसा विचारायचा हे माहित नसेल असे त्यांनी पत्रकाराला सुनावले. गुन्हे घडणारच नाही, असा दावा कोणी करु शकेल का ? गुन्हे तर घडतच राहणार. त्याला आळा घालणं हे पोलिसाचं कामच आहे. देव सुद्धा गुन्हे रोखू शकत नाही. पंधरा सोळा वर्षाची मुले दारु पितात. त्यामुळे गुन्हेगारीत वाढ होत आहे, असे पांडे यांनी सांगितले.

गुन्हे रोखणं हे केवळ पोलिसांचेच काम नाही. जोपर्यंत लोकांमध्ये जागृती निर्माण होत नाही आणि जोपर्यंत गुन्हेगारीविरोधात वातावरण निर्माण होत नाही, तोपर्यंत गुन्ह्यांना आळा बसणार नाही. लोक गुन्हेगारांना हार अर्पण करतात. जाती-धर्माच्या नावाने गुन्हेगारांचे समर्थन केले जाते. त्याला तुम्ही हिरो समजता आणि पुन्हा गुन्हे रोखण्याची मागणीही करता ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Visit : Policenama.com