‘कसं काय जमतं बुवा यांना हे सगळं ? ते रहस्यच’, शिवसेनेचा भाजपा-जेडीयू युतीला टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपाला बिहारमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या तरी नितीशकुमारच हेच मुख्यमंत्री राहतील हे अमित शहा यांचे विधान अतिशय महत्त्वाचे आहे. शहा म्हणाले, नितीशकुमार हे आमचे जुने सहकारी आहेत. त्यामुळे आघाडी मोडण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. नितीशबाबू हा एकच चेहरा बिहारमध्ये आहे, असे सगळ्यांनी ठरवूनच टाकले आहे.

पण सर्वाधिक जागा मिळाल्या तरी. हे बिहारचे सूत्र भाजपाने महाराष्ट्रात किंवा इतरत्र वापरले नाही. नितीशकुमार एनडीएत जाऊन येऊन राहिले. तरी ते निष्ठावान, जुने सहकारी ठरतात. त्याबद्दल नितीशकुमारांच्या कौशल्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. कसे काय जमते बुवा यांना हे सगळे ? ते रहस्यच आहे अशा शब्दात शिवसेनेने आपल्या मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजप-जेडीडू युतीला टोला लगावला आहे.

नितीशकुमार हे जुने व भरवश्याचे सहकारी आहेत हे विधान तर्कसंगत नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार हे भाजप बोरबोर नव्हते. त्यांच्या जदयु पक्षाने लालू यादवांच्या राजदशी आघाडी करुन निवडणुका लढवल्या होत्या. त्या निवडणुकीत नितीशकुमार यांचा मुख्य शत्रू भाजप होता. भाजपनेही नितीशकुमारांवर हल्ले करण्याची मालिकाच चालवली होती. 2014 सालात व 2020 च्या निवडणुकीत साम्यस्थळ एकच, ते म्हणजे तेव्हाही आपल्या जागा जास्त आल्या तरी मुख्यमंत्री नितीशबाबूच होतील, अशी घोषणा लालू यादव यांनी केली होती.

लालू यादव यांनी नितीशबाबू मुख्यमंत्री असल्याची घोषणा केल्याप्रमाणे जदयुच्या जागा लालू यांच्या पक्षापेक्षा कमी येऊनही मुख्यमंत्रीपदी नितीशकुमार विराजमान झाले होते. मात्र मध्येच लालू यादवांशी काडीमोड घेऊन ते भाजपशी सत्तासंगत करुन बसले. बिहारच्या निवडणुकीत नितीशकुमार हा खरोखरच विकासाचा चेहरा आहे काय ? असा सवाल शिवसेनेने आपल्या अग्रलेखातून विचारला आहे. याचे उत्तर त्यांच्याच मंत्रिमडळातील नगरविकास आणि गृहनिर्माणमंत्री सुरेश कुमार शर्मा यांनी दिले आहे.

अग्रलेखातील ठळक मुद्दा

मंत्री सुरेश शर्मा यांनी गडबड अशी केली आहे की, एक झगमगाट करणाऱ्या स्ट्रीट लाईटने उजळून निघालेल्या फ्लायओव्हरचा फोटो स्वत:च्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आणि त्याला शिर्षक दिले, मुझफ्फरपूर स्ट्रीट लाईट योजना. आता जागरूक मतदारही कामास लागले व हा भव्य सुंदर प्रकाशमान रस्ता शोधू लागले. तेव्हा संपूर्ण मुझफ्फरपूर पालथे घातले तरीही मंत्र्यांनी टाकलेला या फोटोतील रस्ता मिळाला नाही.

कारण नितीशकुमारांच्या मंत्र्यांनी स्वत:चे कार्य म्हणून टाकलेला हा फोटो प्रत्यक्षात हैदराबादमधील रस्त्याचा होता. तर बिहारच्या विकासाचा खरा चेहरा हा असा आहे बिहारच्या विधानसभा निवडणुकीत काय होणार, यावर आतापासून पैजा लागल्या आहेत. पंतप्रधान मोदी हे बिहारात बारा सभा घेतील, असेही जाहीर केले आहे. याच रस्त्यांवर बहुधा भाजप-जदयुची संयुक्त प्रचार सभा होईल असे दिसते. नितीशकुमार हे भाजपचे भरवशाचे जुने साथी असल्याने त्यांच्याविषयी जास्त न बोलणेच योग्य !