‘कोरोना’नं बदलली राजकारणाची पद्धत, 7 जूनला बिहारमध्ये होणार गृहमंत्री अमित शहांची Online रॅली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी बिहारच्या जनतेला ऑनलाइन संबोधित करतील. बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भाजपाची निवडणूक तयारी असल्याचे मानले जात आहे.

भाजपा या आयोजनाला यशस्वी करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे, कारण कोविड-19 महामारीमुळे कोणत्याही मोठ्या राजकीय सभेचे आयोजन करता येणार नाही.

ही ऑनलाइन रॅली भाजपाच्या एक महिना चालणार्‍या अभियानाचा भाग आहे, ज्यामध्ये मोदी सरकारच्या कामांची माहिती अधोरेखित केली जाईल. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील पाहिल्या वर्धापन दिनानिमित्त हे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये अमित शाह आगामी विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करतील. बिहारमध्ये भाजपाची मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचा पक्ष जदयू आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या लोजपासोबत आघाडी आहे.

बिहारच्या भाजपा नेत्यांनी म्हटले आहे की, पार्टीने शाह यांचे भाषण ऐकण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना आणि लोकांसाठी 72,000 पेक्षा जास्त मतदान केंद्रांवर व्यवस्था केली आहे.