महाराष्ट्र सरकारवर टीका करणार्‍या गुप्तेश्वर पांडेंची राजकारणात ‘एन्ट्री’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोना काळात देशात होणाऱ्या पहिल्या निवडणुकीचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर करण्यात आला. बिहार विधानसभेची निवडणूक २८ ऑक्टोबर ३ आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यात होणार असून १० नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर केला जाईल. त्याच पार्श्वभूमीवर आता बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. लवकरच ते जेडीयूच्या कंपूत दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गुप्तेश्वर पांडे यांनी नुकतीच बिहार डीजीपी पदावरुन स्वेच्छा निवृत्ती जाहीर केली आहे. त्यानंतर पांडे हे राजकारणात सक्रिय होतील हे स्पष्ट झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गुप्तेश्वर पांडे यांना आपल्या पक्ष कार्यालयात बोलवले आहे. त्याच ठिकाणी त्यांचा पक्षप्रवेश होण्याची चिन्ह आहेत. जनता दल युनाइटेड या पक्षाकडून पांडे वाल्मिकीनगर मधून लोकसभा पोटनिवडणूक लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दुसरीकडे पांडे यांना विधानसभेसाठी बक्सर या मतदारसंघातून उमेदवारी देण्याची सुद्धा चर्चा सुरु आहे. जर वाल्मिकीनगरमधून उमेदवारी मिळाली तर गुप्तेश्वर पांडे यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी ही गोष्ट मोठी ठरू शकेल. त्यामुळे लवकरच पांडे हे नितीशकुमार यांच्या पक्षात सामील होतील. त्यानंतर ते विधानसभा लढणार की लोकसभा पोटनिवडणूक हे लवकरच स्पष्ट होईल.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात गुप्तेश्वर पांडे यांचे नाव समोर आले होते. या प्रकरणावरुन पांडे यांनी ठाकरे सरकारवर टीका करत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. तसेच बिहारमधून चौकशीसाठी मुंबईत अधिकारीही पाठवले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like