बिहारमधील लोक मुंबई-दिल्लीला रोजगारासाठी नव्हे तर ‘हौस’ म्हणून जातात

पाटणा: पोलिसनामा ऑनलाईन – बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचारादम्यान जनता दल युनायटेडच्या एका आमदाराने केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. दरभंगामधील कुशेश्वरस्थानचे जेडीयूचे आमदार आणि यंदा उमेदवार असलेले शशि भूषण हजारी यांनी माझ्या मतदारसंघामध्ये दरवर्षी पुराची समस्या असते. मात्र येथील लोकं कामाच्या शोधात इथर राज्यामध्ये जात नाहीत. मात्र बिहारमधील काही ठिकाणचे लोकं केवळ हौस म्हणून राज्याबाहेर मुंबई-दिल्लीला जातात असं वक्तव्य केले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.

या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. “इतर राज्यांमध्ये कामासाठी गेलेल्यांना किती मजुरी देतात असं विचारल्यावर ते ५०० रुपये असं सांगतात. तर त्याच तुलनेत आपल्या येथे ३५० ते ४०० रुपये मजुरी दिली जाते. त्यामुळे काम करायची इच्छा असेल तर काम येथेही आहे. चार तास काम केल्यास मनरेगाअंतर्गत २०० रुपये मजुरांना मिळतात. मात्र बिहारमधील लोक हे हौशी असतात. त्यामुळे दोन ते चार महिने इथे पुराचा त्रास असतो तेव्हा लोकं विचार करतात, मुंबई-दिल्ली पण फिरुन होईल आणि रोजगारही मिळेल असा विचार करुन जातात. काहीजण तर पुराच्या काळात केवळ फिरण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये जातात. मात्र पूर ओसरल्यावर शेतीच्या कामांसाठी पुन्हा बिहारमध्ये येतात,” असं शशि भूषण हजारी बोलताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

रोजगार आणि मजुरांचे स्थलांतर हा सध्याच्या निवडणुकीमधील महत्वाचा मुद्दा असून सत्ताधाऱ्यांविरोधात या मुद्द्यांवरुन विरोधकांनी चांगलाच प्रचार केल्याचे चित्र दिसत आहे.