कोण होणार मुख्यमंत्री ? नीतीश म्हणाले – ‘मी दावा नाही केला, NDA घेणार निर्णय’

पाटणा : वृत्तसंस्था – बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने विजय मिळवल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीबाबत विचारलेल्या प्रश्नाला नीतीश कुमार यांनी आश्चर्यकारक उत्तर दिले आहे.

सीएम बनण्याच्या निर्णयाच्या प्रश्नावर नीतीश कुमार म्हणाले की, मी मुख्यमंत्री बनण्याचा दावा केलेला नाही. यावर निर्णय एनडीएमध्ये सहभागी पक्ष घेतील की, बिहारचा मुख्यमंत्री कोण होईल. ते म्हणाले की, माझ्याकडून कोणताही दबाव नाही, सीएम पदासाठी एनडीएच्या बैठकीत निर्णय होईल.

यापूर्वी त्यांनी म्हटले होते की, जनतेने एनडीएला बहुमत दिले आहे आणि आम्ही सरकार बनवणार आहोत. शपथ ग्रहणबाबत त्यांनी म्हटले की, याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही की, शपथ ग्रहण छठ किंवा दिवाळीनंतर होईल. आम्ही निकालाचे अवलोकन करत आहोत. सहकारी चार पक्षांचे नेते उद्या बैठक घेतील. ते म्हणाले की, यामध्ये तीन ते चार दिवसांचा वेळ लागू शकतो.

ते म्हणाले की, आम्ही जदयूच्या घटलेल्या मतांच्या टक्केवारीचे अवलोकन सुद्धा करू. चिरागबाबत ते म्हणाले, एलजेपीने आमच्या सर्व उमेदवारांच्या विरोधात आपले उमेदवार उभे केले होते. नीतीश यांनी म्हटले की, आम्ही बिहारच्या लोकांच्या कल्याणासाठी आणि राज्याच्या विकासासाठी सातत्याने काम केले आहे. आम्ही बिहारच्या विकासासाठी प्रतिबद्ध राहिलो आहोत.

243 जागांच्या बिहार विधानसभेत एनडीएला 125 जागा मिळाल्या आहेत. भाजपाला 74 जागा आणि जेडीयूला 43 जागा मिळाल्या. तर, आरजेडीच्या वाट्याला 75 जागा आल्या आहेत आणि बिहारचा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. तर त्यांचा सहकारी पक्ष काँग्रेसला 19 जागा आणि वामपंथी दलाला 16 जागा मिळाल्या आहेत. महाआघाडीला एकुण 110 जागा मिळाल्या आहेत.