गुप्तेश्वर पांडेय यांच्या स्वेच्छानिवृत्तीवर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘महाराष्ट्रावर राजकीय तांडव केल्याबद्दल बिहारनं दिलं बक्षीस’

मुंबई : वृत्तसंस्था – बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी व्हीआरएस म्हणजेच स्वैच्छिक सेवानिवृत्ती घेतली आहे. आता या प्रकरणाबाबत राजकीय विधानही केली जात आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, ‘महाराष्ट्रातील त्यांच्या ‘राजकीय तांडवा’मागील अजेंडा आता स्पष्ट झाला आहे. मुंबई प्रकरणातील वक्तव्यांमधून ते एक राजकीय अजेंडा चालवत होते. ज्यासाठी बिहारच्या नितीशकुमार सरकरने त्यांना आता बक्षीस दिले आहे.’ वास्तविक सुशांत सिंह राजपूत प्रकरणात जेव्हा महाराष्ट्र सरकारने चौकशी करायला आलेल्या बिहारचे आयपीएस विनय तिवारी यांना सक्तीने क्वारंटाइन केले होते, तेव्हा गुप्तेश्वर पांडे यांनी सोशल मीडियाचा वापर करून महाराष्ट्र सरकारला घेरले होते. आता त्याबाबतच राऊतांनी निशाणा साधला आहे.

व्हीआरएसनंतर बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. संजय राऊत म्हणाले की, जो पक्ष त्यांना उमेदवार करेल त्या पक्षावर लोक विश्वास ठेवणार नाहीत. त्यांच्या निवडणुक लढवण्याच्या बातमीवर गुप्तेश्वर पांडे म्हणाले, ‘अद्याप मी कोणत्याही राजकीय पक्षात सामील झालेलो नाही. निवडणूक लढवण्याचाही अद्याप कोणता निर्णय झालेला नाही. जिथपर्यंत माझ्या समाजसेवेचा प्रश्न आहे, ती मी राजकारणात न येता देखील करू शकतो.’

माझ्या व्हीआरएसचा सुशांत प्रकरणाशी काही संबंध नाही. गुप्तेश्वर पांडे म्हणाले की, बरेच लोक मला ट्रोल करत आहेत. लोक सुशांत प्रकरणाशी जोडून पहात आहेत. सुशांत प्रकरणाचा माझ्या व्हीआरएसशी काही संबंध नाही. मी सुशांतच्या निराश व हताश वडिलांना मदत केली, पण माझ्या सीबीआयच्या शिफारशीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. जेव्हा आमच्या पोलिसांबरोबर चुकीचे झाले तेव्हा आम्ही गोंधळ केला. मी सुशांतच्या न्यायासाठी लढा दिला. लोक म्हणत आहेत की, मी सुशांतचा मुद्दा उचलला, लोक त्याला राजकारणाशी जोडत आहेत जे चुकीचे आहे.

आता कोणाला मिळाली डीजीपीची जबाबदारी?
गुप्तेश्वर पांडे यांचा कार्यकाळ संपायच्या आधी सेवानिवृत्ती (व्हीआरएस) घेण्याची चर्चा बर्‍याच काळापासून सुरू होती. आता त्यांनी व्हीआरएससाठी अर्ज केला असून तो राज्य सरकारने मंजूर केला आहे. सिव्हिल डिफेन्स अँड फायर सर्व्हिसेसचे डीजी संजीव कुमार सिंघल यांना पुढील आदेश येईपर्यंत डीजीपी बिहारचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.