‘3 युवराज कुठं हनीमूनला जातात, काय करतात माहिती नाही’, ‘या’ नेत्याचे वादग्रस्त विधान

पटणा : वृत्तसंस्था – देशात महत्वाच्या घडामोडी होत असताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे परदेशात गेल्याने विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होत आहे. अशातच बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तान आवाम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जीतन राम मांझी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले आहे. तसेच त्यांनी बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, एलजेपी अध्यक्ष चिराग पासवान यांच्यावर देखील टीका केली आहे. ऐनवेळी ते कुठेतरी बाहेर गेलेले असतात यावरून त्यांनी निशाणा साधला आहे.

जीतन राम मांझी यांनी म्हटलं आहे की, भारताचे, बिहारचे जे तीन युवराज आहेत, मग ते राहुल गांधी असोत, चिराग पासवान असोत किंवा तेजस्वी यादव असोत. वेळ आली की तिघेही त्यांचा हनीमून साजरा करायला कुठं जातात की काय करतात याचा पत्ता नसतो, असे वादग्रस्त वक्तव्य मांझी यांनी केले आहे. मांझी यांच्या निवासस्थानी हिंदुस्तान आवाम मोर्चाची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

आजच्या बैठकीमध्ये जीतन राम मांझी हेच पक्षाचे अध्यक्ष राहतील असा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी पक्षाचे नेतृत्व संतोष सुमन यांच्यावर सोपवण्यात येईल असे वाटत होते. मात्र मांझी यांनी स्पष्ट केलं की, सध्या तरी पक्षाची जबाबदारी आपल्याकडेच राहील. यावेळी बोलताना बोलताना मांझी म्हणाले, विधानसभा निवडणुकीत जर आमचा पक्ष सात जागा जिंकला असला तर सत्तेची चव आमच्याकडे राहिली असती असा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे आभार मानता म्हणाले, नितीश कुमार यांनी आम्हाला मुख्यमंत्री केलं आणि याचा फायदा गरीबांना होणार आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीहे देशात महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना परदेशात गेल्याची चर्चा होत आहे. शेतकरी आंदोलन सुरु असताना राहुल गांधी हे परदेशात आजीच्या भेटीसाठी गेल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. त्यातच आता जीतन मांझी यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.