Lockdown मध्ये तब्बल 1200 KM चा सायकल प्रवास करणार्‍या ज्योतीची कहाणी रुपेरी पडद्यावर

पोलिसनामा ऑनलाईन टीम – लॉकडाउन कालावधीत वडिलांना सायकलच्या मागच्या सीटवर बसवून हरियाणातील गुडगावपासून बिहारपर्यंत तब्बल 1 हजार 200 किमीचा प्रवास करणारी ज्योती कुमारी चर्चेत आली होती. सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये ज्योतीची कहाणी समजल्यानंतर सर्व स्तरातून तिचे कौतुक झाले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीनेही ज्योतीचं कौतुक केले होते. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने ज्योतीला लॉकडाउन संपल्यानंतर दिल्लीत ट्रायल्स देण्यासाठी बोलावले होते. परंतू ज्योतीने ही ऑफर नाकारत शिक्षण पूर्ण करण्याला  प्राधान्य दिले. ज्योतीच्या याच संघर्षाची कथा आता रुपेरी पडद्यावर येणार आहे.

ऑगस्ट महिन्यापासून चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. या चित्रपटाला ‘आत्मनिर्भर’ असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये ज्योती छोटीशी भूमिकाही करणार आहे. या चित्रपटात ज्योतीच्या कहाणीसोबतच लॉकडाउन काळात तिला वडिलांसोबत सायकलने प्रवास का करावा लागला ? या प्रश्नाचाही वेध घेतला जाणार आहे. ही ऑफर स्विकारुन मला खूप आनंद होतोय अशी प्रतिक्रीया ज्योतीने दिली आहे.

गुडगाव ते दरभंगा या मार्गावर या सिनेमाचे चित्रीकरण होणार असून, या प्रवासादरम्यान तिला काय-काय अनुभव आले हे आम्ही मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक शाईन क्रिष्णा यांनी सांगितले. हिंदी, इंग्रजी आणि मैथिली भाषेत चित्रपट बनवली जाणार असून अन्य भाषांमध्येही या चित्रपटाचे डबिंग केले जाणार आहे