अरे देवा ! बिहारमध्ये 264 कोटी रूपये खर्च करून बनवलेला ‘हा’ पूल 29 दिवसही टिकला नाही, मुख्यमंत्र्यांनी केलं होते उद्घाटन

गोपाळगंज : बिहार सध्या दुहेरी समस्येला तोंड देत आहे. एकीकडे पूराचा कहर आणि दुसरीकडे कोरोनाचे संकट, आणि आता वरून प्रशासनाच्या अपयशाचा फटका सुद्धा बसला आहे. सुशासनाचा दावा करणार्‍या नितिश कुमार सरकारची पोलखोल गोपाळगंजमधील पूलाने केली आहे. या पुलाचा एक भाग ढासळला आहे. एक महिन्यापूर्वीच सत्तरघाट महासेतुचे उद्घाटन झाले होते आणि 264 कोटी रूपये एका महिन्यात पाण्यात वाहून गेले आहेत.

16 जूनरोजी सीएम नितिश कुमार यांनी पाटणाहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या पूलाचे उद्घाटन केले होते. लोकांचे म्हणणे आहे की, एक महिन्यापूर्वीच या पूलाचे उद्घाटन झाले होते. पाण्याच्या जास्त दाबामुळे पुल तुटला आहे. लोकांचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. तर इकडे लोकांचा लालछापर, मुजफ्फरपुर, मोतिहारी, बेतियाकडे जाण्याचा मार्गही बंद झाला आहे.

हा पूल गोपाळगंजला चंपारणशी आणि यासोबतच तिरहुतच्या अनेक जिल्ह्यांना जोडत होता. गोपाळगंजमध्ये बुधवारी तीन लाखांपेक्षा जास्त क्यूसेक पाण्याचा विसर्ग होता. इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा दाब सहन न करू शकल्याने या महासेतूचा एक अ‍ॅप्रोच रोड तुटला.

वैकुंठपुरच्या फैजुल्लाहपुरमध्ये हा पुल तुटला आहे. भाजपा आमदार मिथिलेश तिवारी यांनी याबाबतची माहिती बिहारचे रस्ते निर्मिती विभागाचे मंत्री नंदकिशोर यादव यांना दिली आहे.

या महासेतुचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले असल्याचा आरोप आता होत आहे. हे काम बिहार पूल निर्मिती विभागाने केले होते. 2012 मध्ये या पूलाच्या कामाला सुरूवात करण्यात आली होती. काम पूर्ण झाल्यानंतर मागील 16 जून 2020 ला या महासेतूचे उद्घाटन केले होते.

तेजस्वी यादव यांनी केले ट्विट
या घटनेवर आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, 8 वर्षात 263.47 कोटी रूपये खर्च करून बांधलेल्या गोपाळगंजचा सत्तर घाट पूलाचे 16 जूनला नितिश कुमार यांनी उद्घाटन केले होते. 29 दिवसानंतर हा पूल उद्ध्वस्त झाला आहे. खबरदार! जर कुणी यास नितिशचा भ्रष्टाचार म्हणाल तर? 263 कोटी तर सुशासनी मुंह दिखाई आहे. इतक्या पैशांची तर त्यांचे उंदीर दारू पितात.