निवडणुकीपूर्वी नितीशकुमार यांना धक्का ! मंत्री श्याम रजक RJD मध्ये जाण्याची शक्यता

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुका पाहता राजकीय हालचाली वाढल्या आहेत. बिहारचे उद्योगमंत्री श्याम रजक उद्या म्हणजेच सोमवारी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतात. माहितीनुसार नंतर ते जेडीयू सोडून राष्ट्रीय जनता दलात (आरजेडी) सामील होऊ शकतात. सध्या 17 ऑगस्ट रोजी त्यांनी दिलेला राजीनामा निश्चित मानला जात आहे. श्याम रजक आरजेडीमध्ये सामील होतील याबद्दल पूर्वीपासूनच कयास लावले जात आहेत. दरम्यान, अद्याप याबद्दल अधिकृतपणे घोषणा झालेली नाही. बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी श्याम रजक यांची नाराजी आणि आरजेडीमध्ये प्रवेश हा जेडीयूला मोठा झटका मानला जात आहे.

दरम्यान, श्याम रजक हे एकेकाळी लालू प्रसाद यादव यांच्या निकटवर्तीय नेत्यांमध्ये गणले जात होते. श्याम रजक हे बिहारमधील राबड़ी देवी सरकारमध्येही मंत्री देखील होते. असे म्हटले जाते की, श्याम रजक यांना जेडीयूमध्येल दुर्लक्षित असल्यासारखे जाणवत होते. बरेच प्रयत्न करूनही जेव्हा परिस्थिती बदलली नाही, तेव्हा श्याम रजक आपल्या जुन्या पार्टी आरजेडीमध्ये परतण्याची शक्यता वाढू लागली होती. श्याम रजक यांनी 2009 मध्ये राष्ट्रीय जनता दल सोडला आणि जेडीयूमध्ये प्रवेश केला. जेडीयूच्या तिकिटावर विधानसभा निवडणुका लढवून ते मंत्री झाले. सध्या बिहारमधील महत्वाचा दलित चेहरा म्हणून ओळखले जाणारे श्याम रजक पुन्हा राष्ट्रीय जनता दलात परतल्याचे बोलले जात आहे. श्याम राजक यांचे आरजेडीत पुनरागमन हे जातीय समीकरणाच्या बाबतीत नितीशकुमारांच्या पक्षाच्या जेडीयूला मोठा धक्का मानला जात आहे.

एलजेपी आणि जेडीयूचे नाते
नितीशकुमार यांना सोडण्याचा श्याम रजक यांनी घेतलेला निर्णय अशा वेळी घेतला आहे, जेव्हा एनडीएचे भागीदार एलजेपीचे बिहारमधील जेडीयूशी असलेले नात्याचे बिघडत चालले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्यात संघर्ष वाढत आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची फेरी सुरूच आहे.