अरे व्वा ! आता 2 मिनिटात कळणार व्यक्ती +ve आहे की -ve; IIIT च्या विद्यार्थ्यांनं केली कमाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाला हरवण्यासाठी सर्वच स्तरांतून प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईत डॉक्टर, फ्रंटलाइन वर्कर संपूर्ण ताकदीने लढा देत आहेत. कोरोनाला हरवायचे असेल तर यासाठी महत्वाचे आहे ते म्हणजे टेस्टिंग. सध्या टेस्टिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. टेस्टिंग लवकर करणे हे खरंच आव्हानात्मक आहे. मात्र, बिहारमधील आयआयआयटीच्या विद्यार्थ्यांनी यावर यश मिळवलं आहे.

अवघ्या दोन मिनिटात मिळते माहिती

IIIT च्या विद्यार्थ्यांनी बनवलेले सॉफ्टवेअर एवढे उपयुक्त आहे की, यामुळे व्यक्तीला कोरोना आहे किंवा नाही हे केवळ दोन मिनिटात समजते. या सॉफ्टवेअरच्या मदतीने रुग्णाच्या छातीचा एक्सरे काढला जातो. त्यानंतर सिटी स्कॅन काढला जातो. हे दोन्ही रिपोर्ट केवळ काही मिनिटात मिळतात. त्यामुळे संबंधित व्यक्तीला कोरोना आहे किंवा नाही हे लगेच समजते. या सॉफ्टवेअरमुळे केवळ कोरोनाच नाही तर टीबी, व्हायरल आणि बॅक्टेरियल निमोनिया सह इतर सामान्य रुग्णांच्या एक्सरे प्लेट वरुन आजाराची माहिती सेकंदात मिळू शकते.

सॉफ्टवेअरचे टेस्टिंग सुरु

IIIT च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या महत्त्वपूर्ण सॉफ्टवेअरची सध्या टेस्टिंग सुरु आहे. या सॉफ्टवेअरला मान्यता देण्यासाठी ICMR ने सल्लागार समितीची स्थापना केली आहे. पटणा एम्स मध्ये सध्या टेस्टिंग सुरु असून कोविड डिटेक्टिंग सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पुढील दोन ते तीन दिवसांत अनेक कोविड रुग्णांचा एक्सरे आणि सिटी स्कॅन इमेजेसची तपासणी केली जाणार आहे. यानंतर रुग्णाच्या निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह रिपोर्टच्या डेटाचा स्टडी करण्यात येणार आहे. यानंतर हा रिपोर्ट आयसीएमआरला पाठवला जाईल. त्यानंतर पुढील आठवड्यापर्यंत याला मान्यता देयची की नाही याचा निर्णय घेतला जाईल.