जगातील सर्वात मोठ्या लशीकरणाचे रांगोळ्या काढून स्वागत ! औक्षण करुन देणार शुभेच्छा

पुणे : संपूर्ण जगाला वेठीस धरणार्‍या कोविड १९ विषाणुविरुद्ध लढण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक लसीकरण मोहिमेला आज सकाळी सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी साडेदहा वाजता या देशव्यापी लसीकरणाचे औपचारिक उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर देशातील ३ हजार ६ लसीकरण केंद्रावर ही मोहीम सुरु होणार आहे. या केंद्रातून आज पहिल्या दिवशी सर्वाधिक ३ लाख लोकांना लशीचा पहिला डोस देण्यात येत आहे. एक केंद्रावर प्रत्येक दिवशी १०० जणांना लस देण्यात येणार आहे. केंद्रात लसीकरणाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. लस देण्यात येणार्‍यांचे औक्षंण करुन स्वागत करण्यात येणार आहे. काही केंद्रात फुले, फुगे लावून सुशोभिकरण करण्यात आले आहे.

या लसीकरण मोहिमेसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यातील २८५ केंद्रातून २८ हजार ५०० जणांना आज ही लस देण्यात येणार आहे. लसीकरण मोहिमेत ज्या डॉक्टर, परिचारिकांना सर्वप्रथम ही लस देण्यात येणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी विशेष रंगोळी लसीकरण केंद्रात रेखाटण्यात आली आहे.

पुण्यात आठ ठिकाणी लसीकरण करण्यात येत आहे. या केंद्रावर आज प्रत्येकी १०० जणांना लस देण्यात येत आहे. लस दिल्यानंतर प्रत्येकाला पुढील अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. ज्यांना लशीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. त्या सर्वांना लशीबाबतची माहिती देण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात देशातील कोविड योद्ध्यांचे सर्वप्रथम लसीकरण करण्यात येणार आहे. त्यात आरोग्य सेवक, डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस यंत्रणा तसेच सैन्य दलाचा समावेश आहे.