70 वर्षाच्या शेतकऱ्यानं 30 वर्षात डोंगर ‘कापून’ बनवला 5 KM लांबीचा ‘कालवा’

गया/बिहार : वृत्तसंस्था – बिहारमधील माऊंटन मॅन दशरथ मांजी यांनी 22 वर्षाच्या कठोर परिश्रमानंतर 360 फूट लांब 30 फूट रुंद आणि 25 फूट उंच डोंगर कापून रस्ता बनवला होता. आता अशाच एका 70 वर्षीय लौंगी भुईया यांनी खेड्यातील लाखो लोकांच्या अडचणीवर आपल्या कष्टाने मात केली आहे. 30 वर्षाच्या मेहनतीने डोंगर कापून पाच किमी लांबीचा कालवा त्यांनी तयार केला आहे. डोंगर आणि पावसाचे पाणी कालव्यातून शेतात जात असल्याने या गावातील लोकांना याचा खूप मोठा फायदा झाला आहे.

बिहार मधील गया येथील रहिवासी असलेल्या लौंगी भुईया यांनी कठोर मेहनत घेऊन एक अनोखं उदाहरण सर्वांसमोर ठेवलं आहे. जे काम वर्षानु वर्षे सर्वांच्या लक्षात राहील. भुईया यांनी सलग 30 वर्षे डोंगर कापण्याच काम केलं. त्यांच्या या कामामुळे पावसाळ्यात डोंगरावर पडणारे पावसाचे पाणी कालव्यातून गावात आणले गेले. भुईया हे दररोज घरातून निघून थेट जगंलावर जात होते आणि एकट्याने त्यांनी कालवा बांधण्यास सुरुवात केली. कोठीलवा गावचे रहिवासी असलेले भुईया आपला मुलगा, सुन आणि पत्नीसोबत राहतात.

भुईया यांनी सांगितले की, पहिल्यांदा कुटुंबातील लोकांनी त्याला खूप विरोध केला. पण त्याने घरातील कोणाचेही ऐकले नाही आणि कालवा खोदण्याचे काम सुरु ठेवलं. वास्तविक पाहिले गेले तर या भागातील लोक पाण्याच्या समस्येमुळे मका आणि हरभरा हिच पिकं घेतात. त्यामुळे या गावातील अनेक तरुण नोकरीच्या शोधात खेड्यातून शहरात जात होते. कामाच्या शोधात अनेकांनी गाव सोडले. त्याच वेळी भुईया यांच्या मनात असा विचार आला की, इथे पाण्याची व्यवस्था असेल तर लोकांचे स्थलांतर थांबवता येईल. त्यांच्या कठोर परिश्रमानंतर आज कालवा तयार झाला असून या भागातील तीन गावांतील तीन हजार लोकांना याचा मोठा फायदा झाला आहे.

ग्रामस्थांनी सांगितले की, जेव्हा केव्हा आम्ही पाहिलं, तेव्हा ते घरात कमी आणि जंगलात जास्त दिसत होते. त्याचबरोबर लौंगी भुईया यांचे म्हणणे आहे की, जर सरकार काही मदत देऊ शकली तर शेतीसाठी ट्रॅक्टर सारख्या सुविधा मिळू शकतील. शेतीसाठी नापीक जमीन सुपीक बनू शकेल. ज्यामुळे लोकांना खूप मदत होईल. त्यांच्या या कामामुळे अनेकजण प्रभावित झाले आहेत. आज त्यांचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात घेतले जात आहे. प्रत्येक जण त्यांना अभिवादन करत आहे.