पाकिस्‍तानी नागरिकांना ४८ तासांत जिल्‍हा सोडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जयपूर (राजस्‍थान) : वृत्तसंस्था – गुरुवारी (दि-१४) जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर भ्याड हल्ला केला. याचे तीव्र पडसाद पूर्ण देशात उमटत असताना दिसत आहेत. यानतंर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. पाकिस्‍तानला जशास तसे उत्‍तर द्या, पाकिस्‍तानला धडा शिकवा, अशी मागणी देशभरातील जनतेकडून होत आहे. असे असतानाच राजस्थानमधील बिकानेरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी येत्‍या ४८ तासांत जिल्हा सोडा असे आदेश पाकिस्तानच्या नागरिकांना दिले आहेत.

पुलवामा हल्ल्यानंतर राजस्थामधील बिकानेरचे जिल्हाधिकारी कुमार पाल गौतम यांनी एक परिपत्रक काढले आहे. त्यात ४८ तासांत पाकिस्‍तानच्या नागरिकांना देश सोडण्याच्या आदेश दिला आहे. गौतम यांच्या या दशामुळे बिकानेर जिल्ह्याच्या हद्दीत कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला राहता येणार नाही. गाैतम यांनी जिल्ह्यामध्ये कलम १४४ लागू केले आहे. याशिवाय राजस्थानमधील सर्व हॉटेलमध्ये पाकिस्तानी नागरिकांना राहण्यास कुमार पाल गौतम यांनी बंदी घातली आहे असेही समजत आहे.

गुरुवारी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झाले. याशिवाय अनेक जवान जखमीही झाले. या हल्ल्यानंतरही पाकिस्‍तानच्या कुरापती सुरुच होत्या. सोमवारीही दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पिंगलिना परिसरात दहशतवादी आणि भारतीय सुरक्षा दल यांच्यात  तब्बल १६ तास चकमक झाली. या चकमकीत एका मेजरसह ४ जवान आणि एक पोलीस शहीद झाला आहे. यात राजस्थानचे एस.राम जे जवानही शहीद झाले आहेत. राम शहीद झाल्‍याची माहिती समजल्यानंतर राजस्‍थानमध्येही संतापाची लाट उसळल्याचे चित्र दिसत आहे.