‘गर्लफ्रेंड’ला फिरवण्यासाठी दुचाकी चोरणारे 3 जण गुन्हे शाखेकडून अटकेत

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – मौजमजा करण्यासाठी दुचीकी चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांच्या गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून १२ गुन्हे उघडकीस आले असून ६ लाख रुपये किंमतीच्या महागड्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखा युनिट ५ ने ही कारवाई पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे फाटा येथील एका हॉटेलजवळ केली.

हिमांशु उर्फ पप्वा योगेश सोळंकी (वय-२० रा. चौधरी पार्क, दिघी), निखील उर्फ सोनू संतोष जाधव (वय-१९ रा. मराठी शाळेजवळ, दिघी), आशिष उर्फ अश्या रोहिदास जाधव (वय-२१ रा. चौधरी पार्क, दिघी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखा युनिट ५ चे पोलीस कर्मचारी फारुक मुल्ला आणि धनंजय भोसले यांना आरोपी सोमाटणे फाटा येथील एका हॉटेलवर येणार असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी सोमाटणे फाटा येथील अन्नपूर्णा हॉटेल जवळ सापळा रचला असता स्कूटीवरून तीन व्यक्ती त्या ठिकाणी आल्या. पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलागा करुन ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. गर्लफ्रेंड बरोबर फिरायला जाण्यासाठी दुचाकी नसल्याने तसेच मौजमजा करण्यासाठी पुणे परिसरातून १४ दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

चोरलेल्या दुचाकी आरोपींनी ते राहात असलेल्या घरापासून काही अंतरावर लपवून ठेवल्या होत्या. आरोपींनी तळेगाव दाभाडे, भोसरी, दिघी, वाकड, फरासखाना, विमानतळ, हडपसर, वडगाव मावळ येथून दुचाकी चोरल्याचे तपासात उघड झाले.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सुधिर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ५ चे पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस उप निरीक्षक निलेश बोडखे, पोलीस कर्मचारी धनंजय भोसले, फारुक मुल्ला, मयुर वाडकर, धनराज किरनाळे, स्वामीनाथ जाधव, संदिप ठाकरे, दत्तात्रय बनसुडे, भरत माने, राजकुमार इघारे, ज्ञानेश्वर गाडेकर, श्यामसुंदर गुट्टे यांच्या पथकाने केली.