मौजमजेसाठी स्पोर्टस बाईक चोरणार्‍या तिघांना अटक

पुणे, पोलीसनामा ऑनलाईन – केवळ मौजमजा करण्यासाठी स्पोर्टस बाईक चोरणार्‍या तिघांना सिंहगड रोड पोलीसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून सव्वा आठ लाखांच्या 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

शुभम राजेंद्र राठोड (वय 21, रा. जांभुळवाडी, आंबेगाव), आकाश कैलास देवकते (वय 24) आणि आकाश उर्फ अंश दत्तमिलन घिरटकर (वय 20, रा. आंबेगाव बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शहरात वाहन चोरट्यांचा दिवसेंदिवस धुमाकूळ वाढतच आहे. त्यापार्श्वभूमीवर पोलीसांकडून सराईत वाहन चोरट्यांची माहिती काढली जात आहे. परिसरातील सीसीटीव्हीचीही पडताळणी केली जात आहे. तर, हे गुन्हे रोखण्यासाठी परिसरात गस्त घातली जात आहे. त्यादरम्यान, सिंहगड रोड पोलीसांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी कर्मचारी श्रीकांत दगडे व पुरूषोत्तम गुन्ला यांना या आरोपींबाबत माहिती मिळाली.

त्यानुसार, सहायक निरीक्षक चेतन थोरबोले, उपनिरीक्षक सुधीर घाडगे, पोलीस कर्मचारी दयानंद तेलंगे पाटील, यशवंत ओंबासे, राहुल शेडगे यांच्या पथकाने यातिघांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याजवळील दुचाकीबाबत चौकशी केली असता त्यांनी ती चोरल्याची माहिती दिली. त्यांना अटक करून सखोल तपास केला असता त्यांनी अशा पद्धतीने शहरातून आणखी दुचाकी चोरल्याचे कबूल केली. त्यांच्याकडून 8 लाख 40 हजाराच्या 10 स्पोर्टस दुचाकी जप्त केल्या आहेत.

आरोपींचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. केवळ मौजमजा करण्यासाठी स्पोर्टस बाईक चोरत होते. चोरलेल्या बाईक ते रात्री घेऊन फिरत असे. त्यानंतर पेट्रोल संपल्यानंतर त्याचठिकाणी सोडून जात असे.

Visit : Policenama.com

You might also like