मालकाकडून चावी मागून चोरी करत होता बाईक, पोलीस सुद्धा झाले हैराण

रांची : झारखंडच्या जामताडा जिल्ह्यात पोलिसांनी अशा सराईत चोराला पकडले आहे, जो लोकांकडे चावी मागून त्यांची बाईक चोरी करत होता. पोलिसांनी या सराईताच्या ताब्यातून चोरीच्या मोटर सायकल जप्त केल्या असून त्या गॅरेज मालकालाही अटक केली आहे, ज्याच्या मदतीने तो चोरीच्या बाईकची वासलात लावत होता.

जामताडा पोलिसांनी एक असा चोर पकडला आहे, जो बाईक चोरी करण्यासाठी दिवस किंवा रात्र पहात नसे. चोरी करतेवेळी त्याला कुणाचीही भिती वाटत नव्हती, कारण बाईक मालकाकडून तो त्यांच्या स्वेच्छेने चावी मागत असे आणि नंतर बाईक गायब करत होता. जोपर्यंत लोकांना या सराईताचा हेतू लक्षात येत असे तापर्यंत खुप उशीर झालेला असायचा. पोलिसांनी पकडलेल्या चोराचे नाव वसीम शेख आहे. सोबतच पोलिसांनी गॅरेज मालक अब्दुल वकीलला सुद्धा अटक केली आहे. अब्दुल वकील चोरीच्या बाईक घेऊन पुढील काम करत होता.

प्रकरणाची माहिती देताना आयपीएस शुभांशु जैन यांनी सांगितले की, जिल्ह्यात बाईक चोरीची अशी अनेक प्रकरणे समोर आली, ज्यामध्ये चोराने वेगळ्या पद्धतीने चोरी केली होती. त्यांनी सांगितले की, चोर कोणत्याही मोठ्या दुकानात जात होता, आणि तेथे सामान खरेदी करण्यासाठी मोठी लिस्ट दुकानदाराला देत असे.

जेव्हा पैसे देण्याची वेळ येत होती, तेव्हा पाकिट घरी विसरल्याचा बहाणा तो करत होता. यानंतर तो दुकानदाराला आपल्या बोलण्यात गुंतवूण, त्याची बाईक हे सांगून घेत असे की, त्याला घरून पैसे आणायचे आहेत. विक्रीच्या लालसेने दुकानदार सुद्धा बाईकची चावी विचार न करता चोराच्या हातात सोपवत असे, ज्यानंतर हा सराईत सहजपणे बाईक घेऊन अब्दुल वकीलच्या गॅरेजवर येत होता.

पोलिसांनी सांगितले की, कुणीही ओळखू नये, म्हणून तो मास्कने चेहरा लपवत होता. पोलिसांनी आरोपीकडून चोरीच्या बाईकसुद्धा जप्त केल्या आहेत. बाईक चोरीच्या अनेक गुन्ह्यांची त्याने कबुली दिली आहे.