500 रूपये घेऊन देखील पंचायतीच्या निवडणूकीत बापाला मतदान केलं नाही, उमेदवाराच्या ‘नाराज’ मुलाकडून युवकाचा खून

बिलासपूर : वृत्तसंस्था – छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये एका तरुणाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. बिलासपूरजवळील खुडुबांथा या गावातील तरुण बेपत्ता होता. त्याचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात मस्तुरी पोलिसांनी तरुणाच्या खुन प्रकरणात दोघांना अटक केली आहे.

पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, 27 जानेवारी रोजी पंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यानंतर मस्तुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास बिलासपूर पोलिसांनी सुरु केला त्यावेळी धक्कादायक खुलासा झाला. पंच उमेदवाराला मतदान करण्यासाठी तरुणाने 500 रुपये घेऊनही मतदान केले नसल्याचा आरोप करत उमेदवाराच्या मुलाने आणि त्याच्या मित्राने तरुणाचा खून केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मस्तूरी परिसरातील एका पंचायतच्या निवडणुकीसाठी रामायण कुरे हा निवडणुक लढवत होता. वडीलांना विजयी करण्यासाठी रामायण कुरे याचा मुलगा मुकेश कुरे आणि त्याचा मित्र छन्नू हे प्रचार करत होते. या दोघांनी गुनाराम कुरे या तरुणाला वडीलांना मतदान करण्यासाठी 500 रुपये दिले होते. निवडणुकीच्या निकालात रामायण कुरे याचा पराभव झाला. याचा राग मुलगा मुकेश कुरे याच्या मनात होता.

मस्तूरी पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी फैजुल शाह यांनी सांगितले की, मुकेश याला संशय होता की मृत गुनाराम याने पैसे घेऊन ही आपल्या वडीलांना मतदान केले नाही. यावरून दोघांमध्ये वाद झाले होते. याच वादातून मुकेश आणि त्याचा मित्र छिन्नू या दोघांनी गुनाराम याला बेदम मारहाण करून त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी आणि मृताची ओळख पटू नये यासाठी मृतदेह जाळला. आरोपीविरोधात खुनाचा आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.