फसवणूक केल्याप्रकरणी ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला अटक

रायपूर : वृत्तसंस्था – निवडणुकीत बनावट प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे पुत्र माजी आमदार अमित जोगी याला छत्तीसगड पोलिसांनी अटक केली आहे. विलासपूर येथील त्यांच्या निवासस्थानी ही कारवाई करण्यात आली. यावेळी जोगी यांच्या बंगल्यावर मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक हजर होते. त्यांनी पोलिस आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणा दिल्या. याबाबत मरवाही विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार राहिलेल्या समीरा पैकरा यांनी तक्रार दाखल केली होती.

3 फेब्रुवारी 2018 रोजी अमित जोगी यांच्या विरोधात कलम 420 अंतर्गत गोरेला पोलिस स्थानकात तक्रार नोंद केली होती. अमित जोगी यांनी निवडणुकीच्यावेळी निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रात आपली जन्मतारिख आणि जन्मस्थळ चुकीचे सांगितले होते. यावरुन जोगी यांच्याविरोधात पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अमित जोगी यांनी 2013 मध्ये मारवाही येथून विधानसभा निवडणूक लढविली होती. यावेळ त्यांनी भाजपच्या उमेदवार समीरा पैकरा यांचा 50 हजार मतांनी पराभव केला होता. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर समीरा पैकरा यांनी हायकोर्टात याचिका दाखल करीत अमित जोगी यांची जात आणि जन्मतारिखेला आव्हान दिले होते.

पैकरा यांच्या तक्रारीनुसार, अमित जोगींनी प्रतिज्ञापत्रात आपला जन्म सन 1978 मध्ये सारबहरा गौरेला येथे झाल्याचे म्हटले होते. मात्र, जोगींचा जन्म 1977 मध्ये अमेरिकेतील टेक्सास प्रांतातल्या डग्लास येथे झाला आहे.

छत्तीसगड विधानसभा निवडणुका आता संपल्याने ही याचिका फेटाळण्यात येत असल्याचा निर्णय चार दिवसांपूर्वी हायकोर्टाने दिला होता. यावर समीरा पैकरा यांनी गौरेला पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली होती.

You might also like