काय सांगता ! होय, बिल गेट्स बनले जगातले सर्वात् मोठे शेतकरी

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानी आहेत. बिल गेट्स यांनी मोठ्या प्रमाणावर शेतजमीन खरेदी केली आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, या जमिनीवर ते स्मार्ट सिटी उभारणार आहेत. बिल गेट्स यांनी शेत जमिनीशिवाय इतर जमीनही खरेदी करून ठेवली आहे. अशा प्रकारे त्यांची २ लाख ६८ हजार ९८४ एकर जमीन नावावर आहे. तसंच, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक असलेल्या बिल गेट्स यांनी अमेरिकेतील वेगवेगळ्या १८ राज्यांमध्ये एकूण २ लाख ४२ हजार एकर शेतजमीन खरेदी केली आहे.

दोन वर्षांपूर्वी २०१८ मध्ये वॉशिंग्टनमध्ये १६ हजार एकर जमिनीची त्यांनी खरेदी केली होती. वॉशिंग्टनमध्ये खरेदी करण्यात आलेल्या जमिनीपैकी १४.५ हजार एकर जमीन हॉर्स हेवन हिल्समध्ये होती. या जमिनीसाठी त्यांनी जवळपास १२५१ कोटी रुपये मोजले होते. इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतजमीनीच्या खरेदीबाबत त्यांनी काही सांगितलेलं नाही. जमीन कशासाठी खरेदी केली, काय करणार याची माहिती दिलेली नाही. कास्केड इन्वेस्टमेंट कंपनीनेसुद्धा यावर प्रतिक्रिया दिली नाही. ही कंपनी शाश्वत शेतीसाठी मदत करते. दरम्यान, बिल गेट्स यांनी एरिझोनामधील जमिनीवर स्मार्ट सिटी उभारण्याची योजना तयार केली आहे.

६५ वर्षांचे असलेले बिल गेट्स यांनी अमेरिकेतील बहुतांश राज्यांमध्ये जमिनीची खरेदी करून ठेवली आहे. अर्कंकसमध्ये ४८ हजार एकर तर एरिझोनात २५ हजार एकर शेतजमीन घेतली आहे.”बिल गेट्स हे आफ्रिका आणि जगातील इतर विकसनशील देशात लहान शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करतील. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २२३८ कोटी रुपयांची मदत ते करत आहेत. फाउंडेशनच्या मदतीचा उद्देश लहान शेतकऱ्यांना गरीबीतून बाहेर काढणे आहे,” बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनने २००८ मध्ये अशी घोषणा केली होती.