कर्जबाजारी झालेल्या पाकिस्तानला आता बिल गेट्सचा ‘आधार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाठी कोणतेही गोष्ट चांगली घडताना सध्या दिसत नाही. दहशतवादाच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर तोंडावर पडल्यानंतर आता पाकिस्तानची जगभरात कोंडी झाली आहे. मात्र यामध्ये पाकिस्तानसाठी चांगली बातमी आहे. कर्जाच्या घाईत बुडालेल्या पाकिस्तानला मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आता पाकिस्तानला मदत करणार आहेत.

बिल अँड  मिलिंडा गेट्स फाउंडेशन हे पाकिस्तानला सुमारे 200 मिलियन डॉलरची मदत करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी इम्रान खान आणि बिल गेट्स यांच्यात एक करार झाला. या करारानुसार हा पैसा पाकिस्तानमधील गरिबी हटवण्यासाठी वापरला जाणार आहे. पाकिस्तानमधील ‘एहसास’  या अभियानासाठी हा  पैसा वापरला जाणार आहे. 2020 पर्यंत हा फंड खर्च केला जाणार आहे.

गरिबीचा मार
दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात गरिबी पसरली आहे. देशाची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात बिघडली असून मोठ्या प्रमाणात कर्जाचा डोंगर देखील पाकिस्तानवर उभा राहिला आहे.

6 लाख कोटींचे कर्ज
पाकिस्तान सतत विविध देशांकडून कर्ज घेऊन देशाचा कारभार करत आहे. आतापर्यंत पाकिस्तानवर 85 बिलियन डॉलर  म्हणजेच भारतीय चलनात 6 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज आहे. जगभरातील विविध देशांकडून पाकिस्तानने कर्ज घेतले आहे. चीनकडून सर्वात जास्त कर्ज पाकिस्तानने घेतले आहे.