Pune : पिवळया अन् केशरी रेशनकार्डधारकांसाठी महापालिकेनं घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून कोरोनाला अटोक्यात आणण्यासाठी पुणे महापालिकेकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. पुणे महापालिका आणि राज्य सरकारच्या अनेक आरोग्य योजनांसाठी जे नागरिक पात्र ठरत नाहीत यांच्यासाठी पुणे महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. ज्यांच्याकडे पिवळे-केशरी शिधापत्रिका आहे, अशा कोरोना बाधित रुग्णांनी महापालिकेने करार केलेल्या दहा खासगी रुग्णालयात उपचार घेतले तर त्यांच्या बिलाची रक्कम महापालिका ‘सीएचएस’ दराने भरणार आहे. परंतु ज्या रुग्णांची स्वत:ची आर्थिक परिस्थीती चांगली आहे, ते या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही, असे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

पुण्यात वाढणारा कोरोनाचा प्रसार आणि रुग्णांवर होणाऱ्या उपचारांसाठी महापालिका विशेष प्रयत्न करत आहे. महापालिकेने कोरोनावरील उपचारांसाठी दहा खासगी रुग्णालयांशी करार केला आहे. या रुग्णालयातील खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्या रुग्णालयांमध्ये शासनाने निश्चित केलेल्या दरानुसारच उपचार केले जात आहेत. बाधित आणि संशयीत रुग्णांना महापालिका शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील पात्र लाभार्थ्यांना या खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास एक लाखापर्यंतचे वैद्यकीय सेवा देण्यात येते. तसेच शासनाच्या महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, जनरल इन्शुरन्स पब्लिक सेक्टर असोसिएशन, पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट योजनांचाही लाभ देण्यात येतो.

या योजनांसाठी जे नागरिक पात्र ठरत नाही, मात्र त्यांच्याकडे पिवळे-केशरी शिधापत्रिका आहे अशा रुग्णांनी महापालिकेने करार केलेल्या खासगी रुग्णालयात उपचार केल्यास त्यांच्या उपचाराचा खर्च महापालिका सिएचएस दराने करणार आहे, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. मात्र, ज्या रुग्णांची स्वत:ची आर्थिक परिस्थीती चांगली आहे, ते या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही, त्यांची बिले पालिका आदा करणार नाही. शासनाच्या 21 मेच्या अधिसुचनेनुार सर्व खासगी रुग्णालयांमर्फत कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.
पालिकेने करार केलेले खासगी रुग्णालय
1. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर
2. इलॅक्स अ‍ॅण्ड बुधराणी हॉस्पिटल, कोरेगाव पार्क
3. सिंबॉयसीस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर, लवळे
4. राव नर्सिंग होम, बिबवेवाडी
5. पुना हॉस्पिटल, सदाशिव पेठ, अलका टॉकीज शेजारी
6. सह्याद्री हॉस्पिटल, कोथरुड
7. श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, मुंबई-पुणे बायपास, नऱ्हे
8. ग्लोबल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, दत्तवाडी पोलीस चौकीजवळ
9. भारती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे सातारा रोड, धनकवडी
10. भाकरे सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल अ‍ॅड रिसर्च इन्स्टिट्यूट प्रा.लि. कात्रज