कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाहिरात फलकाचे आक्रमण

थेऊर : कुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या अवैध रित्या लावलेल्या जाहिरात फलकात अडकले असून याकडे ग्रामपंचायतसह महसूल विभागाचे कोणाचेही लक्ष नाही अशी परिस्थिती आहे यावर स्थानीकांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पुणे सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी हे विकसनशील गाव असून येथे अनेकविध व्यवसाय चालू आहेत शहरालगत असल्याने येथे चाकरमानी आपले स्वप्नातील घरे खरेदी करण्यासाठी येतात. अलिकडे जमीन विकासक (डेव्हलपर) यांनी आपले बस्तान बसवले असून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरत आहेत.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्र महामार्गावरच असून याच्या दर्शनी बाजूस सध्या वेगवेगळ्या जाहिरात फलकांनी आक्रमण केले आहे त्यामुळे हे प्राथमिक केंद्र झाकले गेले आहे यावर स्थानीक प्रशासनाने त्वरीत कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे कारण हे ठिकाण जाहिरात लावण्याची योग्य आहे का याचा विचार व्हायला हवा.

यावर गावचे प्रशासक घोगरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधितांवर नोटीस काढण्यात येईल व ते हटविण्यात येतील.