टाळेबंदीत शिक्षकासह तिघांकडून ‘घाणेरडा’ धंदा ! 17 YouTube चॅनलवर 300 ‘मादक’ अन् ‘अश्लील’ ध्वनिचित्रफिती टाकल्या, कोट्यावधींची कमाई करणारे ‘गोत्यात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तरुणींच्या अश्लील चित्रफिती तयार करून सोशल मीडियावर टाळेबंदीच्या काळात प्रसारित करून कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या तीन तरुणांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे . अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका शिक्षकाचाही समावेश असून तो २००८ मध्ये ठाणे जिल्ह्यातून दहावीत पहिला आला होता.

कोरोनामुळे टाळेबंदी घोषित करण्यात आली होती. त्यावेळी या तरुणांनी १७ यू ट्यूब वाहिन्या तयात केल्या. अधिकाधिक दर्शकसंख्या लाभलेल्या वाहिन्यांना यू ट्यूब, फेसबूक मानधन देते. पैसे कमावण्यासाठी या तरुणांनी तयार केल्या १७ वाहिन्यानवर ३०० अश्लील ध्वनिचित्रफिती प्रसारित केल्या. त्या सुमारे १५ कोटी व्यक्तींनी पाहिल्या. या आरोपींनी हे मानधन तर घेतलेच, शिवाय या चित्रफितींआधारे दर्शकसंख्या वाढवून जाहिरातीही गोळा केल्या. या तिघांनी टाळेबंदीत सुमारे दोन कोटी रुपये या माध्यमातून कमावले, अशी माहिती सायबर विभागाच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी दिली. दरम्यान, आरोपींनी प्रसारित केलेल्या ३०० ध्वनिचित्रफिती सोशल मीडियावरून हटविण्यात आल्या आहेत.

अश्लील ध्वनिचित्रफिती प्रसारित करणाऱ्या, त्या आधारे अर्थार्जन करणाऱ्या अनेक व्यक्ती, टोळ्या असून त्यांची माहिती मिळवली जात आहे, असे करंदीकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान या संदर्भात अनेक तक्ररी राज्य महिला आयोगाकडे तक्रारी आल्या होत्या. आयोगाने त्या तपासासाठी सायबर पोलीस ठाण्याकडे पाठविल्या होत्या.

विनोदी चित्रफितीच्या बहाण्याने…
या प्रकरणातील प्रमुख आरोपी खट्याळ, गमतीदार चित्रफिती चित्रित करण्याच्या बहाण्याने, आर्थिक लाभाचे प्रलोभन दाखवत तरुणींना निर्जन ठिकाणी नेऊन तेथे भलतेच प्रकार करण्यास भाग पाडे. तेथे जर तरुणींनी विरोध केल्यास चित्रीकरणाचा खर्च भरण्याची धमकी तो देत असे.

विशेष म्हणजे तो ज्या खासगी शिकवणीत शिकवतो. तेथे येणाऱ्या विद्यार्थिनींच्या अश्लील ध्वनिचित्रफिती बळजबरी तयार करून घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकाराला काही महिलाही बळी पडल्या असल्याचे समोर आले आहे.

आत्महत्येच्या धमकीनंतरही प्रसारण
पैशाच्या लालसेपोटी बदनामी होईल, लग्न मोडेल, आयुष्य उद्ध्वस्त होईल… अशा विनंत्यांनाही आरोपीने थारा दिला नाही. यापैकी एका तरुणीने चित्रफीत न हटविल्यास आत्महत्या करण्याची धमकी आरोपीला दिली होती. आरोपीने त्या तरुणीची चित्रफीत एका यू-ट्यूब वाहिनीवरून हटवली. मात्र दुसऱ्या वाहिनीवर प्रसारित केली.