मोदींच्या शपथविधीला ‘या’ शेजारी देशांच्या नेत्यांची हजेरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासीक विजय प्राप्त केला. नरेंद्र मोदी गुरुवारी (दि.३०) सायंकाळी सात वाजता दुस-यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यासाठी बिमस्टेकचे (बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन) नेते उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेजारी देशांसोबतचे संबंध उत्तम राखण्यास प्राधान्य देत असल्याने या देशांचे नेते शपथविधीला हजर राहणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

भारताच्या शेजारच्या राष्ट्रापैकी बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि भूतानचा समावेश आहे. भारत देखील बिमस्टेकचा सदस्य आहे. शेजारी राष्ट्रांसोबत भारताचे संबंध उत्तम रहावेत असा हेतू मोदी सरकारचा आहे. त्यासाठीच बिमस्टेकच्या नेत्यांना या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यास किरगिझ प्रजास्ताकचे अध्यक्ष सोरोनबे जीनबीकोव यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या शिवाय मॉरिशनच्या पंतप्रधानांही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीत एनडीए ५४२ पैकी ३५२ जागांवर विजय प्राप्त करत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. भाजपाने यंदाच्या निवडणुकीत २०१४ पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला आहे. एकट्या भाजपाने ३०३ जागा जिंकल्या आहेत. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट दिसून आली हीच लाट यंदाच्या निवडणुकीत देखील दिसून आली. नरेंद्र मोदी गुरुवारी राष्ट्रपती भवनात पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.