मराठमोळा सुबोध भावे करणार राहुल गांधींवर बायोपिक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जवळपास ५००० विद्यर्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर जे मलिष्का आणि अभिनेते सुबोध भावे यांनी केले. अभिनेता सुबोध भावे आणि बायोपिक यांच समीकरण तर आपल्याला ठाऊक आहेच. सध्या सुबोध भावे तुला पाहते रे या मालिकेतून रोज प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. मात्र त्याचा पुढचा बायोपिक कोणता येणार ? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले असताना खुद्द सुबोध भावे यांनीच याचे उत्तर दिले आहे.
सुबोध राहुल गांधी यांच्यावर बायोपिक करण्यासाठी सज्ज झाला आहे.

यावेळी राहुल गांधी यांच्यावर बायोपिक बाबत बोलताना सुबोध म्हणाला, ‘मी अभिनेता आहे आणि आजवर अनेक बायोपिक मी केले आहेत. मला अनेकदा लोक सांगतात की तू राहुल गांधींसारखा दिसतो. त्यामुळे माझा पुढचा बायोपिक मला राहुल गांधींवर करायचा आहे. आज राहुल गांधींसोबत चर्चा करताना मला बऱ्याच नव्या गोष्टी कळल्या. राजकारणापलीकडे जाऊन हा माणूस बरंच काही करतो. राहुल गांधी प्रोफेशनली स्कूबा डायविंग करतात, ते कराटे ब्लॅक बेल्ट आहेत, ते प्रोफेशनल पायलट आहेत. मी त्यांचा फॅन झालो आहे.’ असं सुबोध म्हणाला.

पुण्यातल्या हडपसर येथील मगरपट्टा सिटी येथील महालक्ष्मी लॉन्स येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी अभिनेता सुबोध भावे आणि आरजे मलिष्का यांनी राहुल गांधींची मुलाखत घेतली. यावेळी सुबोध भावे याने राहुल गांधींवर बायोपिक करणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे आता लवकरच सुबोध भावे राहुल गांधी यांच्या भूमिकेत दिसला तर नवल वाटायला नको.