राजधानी दिल्लीसह देशातील 9 राज्यात पसरला बर्ड फ्लू , महाराष्ट्रात 800 कोंबड्यांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाच्या विविध भागात पक्ष्यांच्या मृत्यूच्या बातम्यांदरम्यान केंद्र सरकारने (Central Government) म्हटले की, 9 राज्यात बर्ड फ्लूचा( bird flu) प्रादुर्भाव झाला आहे. केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश व्यतिरिक्त आता महाराष्ट्र आणि दिल्लीमध्येही बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढला आहे. दिल्लीतील संजय तलावाजवळ मृत अवस्थेत आढळलेल्या बदकांची सॅम्पल जालंधर येथे पाठविण्यात आली होती जिथे त्यांच्यात बर्ड फ्लू असल्याची पुष्टी झाली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात 800 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. छत्तीसगडच्या बालोद जिल्ह्यातील कोणत्याही नमुन्यांमधून या संसर्गाची पुष्टी झालेली नाही, असे पशुसंवर्धन व दुग्ध विभागाने निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, केंद्राने विविध प्राणीसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाला निर्देश दिले आहेत कि, दररोज अहवाल केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे (सीझेडए) पाठवावेत आणि त्यांचे क्षेत्र रोगमुक्त घोषित होईपर्यंत असेच सुरू ठेवावे.

महाराष्ट्रात 800 कोंबड्यांचा मृत्यू
महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावात असलेल्या पोल्ट्री फार्ममध्ये सुमारे 800 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे, त्यानंतर त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. या कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळे झाल्याचे तपास अहवालात समोर आले आहे. हा अहवाल उघड होताच प्रशासनाला सतर्क केले गेले. परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुघळीकर यांनी सांगितले कि, मुरुंबा गावाच्या एक किलोमीटरच्या भागात कोंबड्यांना मारण्याचे आदेश दिले असून, या गावाच्या दहा किमीच्या परिघात येणाऱ्या क्षेत्रातील कोंबड्या कोणत्या दुसर्‍या जिल्ह्यात पाठविल्या जाणार नाही.

दिल्लीचा संजय तलाव ‘अलर्ट झोन’ घोषित
रविवारी देशाच्या विविध भागात बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावात आणखी 17 बदके मृतावस्थेत सापडल्यामुळे रविवारी दिल्लीतील संजय तलावाला ‘अलर्ट झोन’ म्हणून घोषित करण्यात आले. शनिवारी दिल्ली विकास प्राधिकरणाने ( DDA ) 10 बदके मृत सापडल्यानंतर प्रसिद्ध जलाशय व उद्यान बंद केले. बर्ड फ्लूमुळे त्यांचा मृत्यू झाला का हे पाहण्यासाठी मृत बदकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. याव्यतिरिक्त, गेल्या काही दिवसांत 14 डीडीए पार्कांमध्ये 91 कावळ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. डीडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी संजय तलावामध्ये आणखी 17 बदकांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 27 बदके मरण पावली आहेत.

इतर राज्यांचे अपडेट :
– पशुसंवर्धन व दुग्ध विभागाने एका निवेदनात म्हटले कि, छत्तीसगडच्या बालोद जिल्ह्यातून घेण्यात आलेल्या कोणत्याही नमुन्यांमधून या संसर्गाची पुष्टी झालेली नाही. दरम्यान, केंद्राने विविध प्राणीसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाला दररोज अहवाल केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे (सीझेडए) पाठवावेत आणि त्यांचे क्षेत्र रोगमुक्त घोषित होईपर्यंत असेच सुरू ठेवावे असे निर्देश दिले.

– पर्यावरण मंत्रालयाअंतर्गत सीझेडएने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे ज्यात असे म्हटले की, एव्हीयन इन्फ्लूएन्झा पक्षांत प्राण्यांमध्ये संसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध आणि नियंत्रण अधिनियम, 2009 अंतर्गत हा एक नियोजित रोग आहे आणि त्याचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी अशा रोगाचा अहवाल देणे अनिवार्य आहे.

– हिमाचल प्रदेशातील कांगरा जिल्ह्यातील पोंग धारण वन्यजीव अभयारण्यात 215 स्थलांतरित पक्षी मृतावस्थेत सापडले आणि ज्यामुळे एव्हीयन इन्फ्लूएन्झामुळे मृत्यू झालेल्या संशयित अशा चिमण्यांची संख्या 4,235 वर गेली आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. सोलन जिल्ह्यातही सलग चौथ्या दिवशी चंदीगड-सिमला महामार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणात मृत कोंबड्या फेकण्यात आल्या.

– राजस्थानमध्ये आणखी 428 पक्ष्यांच्या मृत्यूनंतर राज्यात आतापर्यंत त्यांच्या मृत्यूची संख्या 2,950 वर पोहोचली आहे. रविवारी 428 पक्षी मरण पावले, ज्यात 326 कावळे, 18 मोर, 34 कबूतर आणि 50 इतर पक्ष्यांचा समावेश आहे. राज्यात आतापर्यंत एकूण मृत 2,950 पक्ष्यांमध्ये 2,289 कावळे, 170 मोर आणि 156 कबूतरांचा समावेश आहे.

– मध्य प्रदेशातील 13 जिल्ह्यांमधील कावळ्यांमधील नमुन्यांमध्ये बर्ड फ्लूचा H5N8 प्रकारचा संसर्ग आढळून आला आहे. मध्य प्रदेश जनसंपर्क विभागाने सांगितले की, इंदूर, मंदसौर, आगर मालवा, नीमच, देवास, उज्जैन, खंडवा, खरगोन, गुना, शिवपुरी, राजगड, शाजापूर आणि विदिशा या 13 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत बर्ड फ्लूची नोंद झाली आहे. 9 जानेवारी पर्यंत 27 जिल्ह्यातून 1100 कावळे आणि वन्य पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली

– गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले की, बर्ड फ्लूचा सामना करण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे तयार आहे. एव्हीयन इन्फ्लूएन्झाच्या भीतीने आणि पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी तपासणीसाठी नमुने गोळा करीत असताना गुजरातच्या विविध भागात डझनभर पक्षी मृतावस्थेत सापडले आहेत.

– उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील प्राणिसंग्रहालयात मृतांमध्ये सापडलेल्या पक्षांमध्ये बर्ड फ्लू विषाणू आढळल्यानंतर येथे अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि पुढील आदेश होईपर्यंत ते जनतेसाठी बंद केले गेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. कानपूर प्राणिसंग्रहालयात बर्ड फ्लूच्याच्या पार्श्वभूमीवर, राजधानी लखनऊमधील प्राणी उद्यान आणि बरेलीतील केंद्रीय पक्षी संशोधन संस्था (सीएआरआय) विषाणूपासून बचाव करण्यासाठी चोवीस तास व्यवस्था केली गेली आहे.

केंद्र देखील सतर्क
एक केंद्रीय पथक 9 जानेवारीला केरळमध्ये दाखल झाले असून बाधित भागाचे निरीक्षण करीत आहे. आणखी एक केंद्रीय पथक 10 जानेवारीला हिमाचल प्रदेशात पोहोचले आणि बाधित भागाचे सर्वेक्षण केले. केंद्राने राज्यांना लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि एव्हीयन इन्फ्लूएन्झा विषयी चुकीची माहिती रोखण्यास सांगितले. निवेदनात म्हटले आहे की, राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना जलाशय, पक्षी बाजार, प्राणीसंग्रहालय, कुक्कुटपालन इत्यादींच्या आसपास पाळत ठेवणे, मृत पक्ष्यांचा योग्य तो विल्हेवाट लावण्यासाठी आणि कुक्कुटपालन प्रकारात जैवसुरक्षा बळकट करण्याची विनंती करण्यात आली आहे.