Bird Flu : गावरान कोंबडीला 90 तर बॉयलर कोंबडीला 70 रुपये नुकसान भरपाई, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा

सोलापूर : राज्यात बर्ड फ्लुचे (Bird Flu) थैमान सुरु झाले असून मराठवाडा हे त्याचे प्रमुख केंद्र बनले आहे़ राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बर्ड फ्लुमुळे (Bird Flu)  मृत्यु पावणाऱ्या कोंबड्यांबद्दल राज्य शासन नुकसान भरपाई देणार असल्याची घोषणा केली आहे. गावरान कोंबडीला ९० रुपये, २ महिन्यांच्या बॉयलर कोंबडीला ७० रुपये, लहान पिल्लाला २० रुपये तसेच अंड्याला ३ रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

मराठवाडा हा बर्ड फ्लुचा केंद्र बनला आहे. परभणी, लातूर, बीड या जिल्ह्यांमध्ये ३ हजारांहून अधिक कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून मराठवाड्यातील हजारो कोंबड्यांना दयामरण देण्यात येत आहे. परभणी परिसरातील ३ हजार ४४३ कोंबड्यांना दयामरण देण्यात आले. लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडीत तब्बल ११ हजार ६४ कोंबड्या नष्ट करण्यात आल्या. नांदेडमधील किनवट आदिवासी दुर्गम भागातील झळकवाडी या गावांमध्ये ४०० कोंबड्यांचा मृत्यु झाल्याचे उघड झाले आहे. या मृत कोंबड्या गावाच्या जवळच टाकल्याने गावाभोवती दुर्गंधी पसरली आहे.

स्थलांतरीत पक्षांमुळे मराठवाड्यात बर्ड फ्लुचा फैलाव झाला असून हिवाळ्यात सर्वत्र देशापरदेशातून मराठवाड्यातील जलाशयावर पक्षांचे आगमन होते़ त्यांना रोखण्यासाठी सध्या तरी कोणताही पर्याय प्रशासनासमोर नाही़ मात्र आता नाथसागर जलाशयासह मराठवाड्यातील सर्व जलाशयावर नजर ठेवण्यात येत आहे.