राज्यात बर्ड फ्ल्युचा शिरकाव ! परभणीतील मुरुंबा गावात कोंबड्यांचा मृत्यु बर्ड फ्ल्युमुळेच

परभणी : गेले काही दिवस देशभरात पसरत असलेल्या बर्ड फ्ल्युचा ( Bird flu)  राज्यातही शिरकाव झाला असून परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावात झालेल्या कोंबड्यांचा मृत्यु हा बर्ड फ्ल्युमुळे ( Bird flu)  झाल्याचा अहवाल आला आहे. पुण्यातील प्रयोगशाळेच्या अहवालात येथील कोंबड्यांचा मृत्यु बर्ड फ्ल्युमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता राज्यात सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबतच्या उपाययोजनेसाठी आज सायंकाळी बैठक बोलावली आहे.

परभणीमधील मुरुंबा गावात गेल्या काही दिवसात कोंबड्यांच्या मृत्युचे प्रमाण वाढत होते. सुमारे ५०० ते ८०० कोंबड्यांचा मृत्यु झाल्याने गावात एकच खळबळ उडाली होती. हे समजताच पशु संर्वधन विभागाचे अधिकारी गावात पोहचले. त्यांनी या मेलेल्या कोंबड्यांचे सॅम्पल पुण्यातील प्रयोगशाळेला पाठविले. या प्रयोगशाळेचा अहवाल रविवारी रात्री मिळाला. त्यात या कोंबड्यांचा मृत्यु बर्ड फ्ल्युमुळे झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे परभणीमधील सर्व प्राण्यांच्या वाहतूकीवर तातडीने बंदी घालण्यात आली आहे. मृत्यु पावलेल्या या कोंबड्यांची सुरक्षितपणे विल्हेवाट लावण्यात येत आहे.

दरम्यान, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील मौजे केंद्रेवाडी परिसरातील एका पोल्ट्री फार्ममधील अनेक कोंबड्या शनिवारी अचानक दगावल्याने एकच खळबळ उडाली आहे. या कोंबड्यांच्या मृत्युचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी़ पी़ यांनी केंद्रेवाडीच्या आजू बाजूचा १० किलोमीटरचा परिसर सतर्क विभाग म्हणून जाहीर केला आहे. या भागातील प्राण्यांच्या वाहतूकीवर निर्बंध जारी केले आहेत.

राज्यात बर्ड फ्ल्युचा शिरकाव झाल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून या संबंधी आज सायंकाळी बैठक बोलावली आहे.

बर्ड फ्ल्युची लागण सर्वप्रथम १९९७ मध्ये हाँगकाँगमध्ये झाली होती़ त्यानंतर तो जगभरात पसरला होता़ सध्या भारतातील ७ राज्यात बर्ड फ्ल्युने शिरकाव केला असून महाराष्ट्र हे आठवे राज्य ठरले आहे़ कोरोनाचा कहर गेले वर्षभर सुरु असताना आता बर्ड फ्ल्युशी सामना करण्याची वेळ आली आहे़