Pune News : राज्यातील ‘या’ 3 जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग, पण मानवी संक्रमणाचं अद्याप तरी उदाहरण नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांत बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याचे केंद्र सरकारने रविवारी सांगितले. महाराष्ट्रातील लातूर, परभणी, उदगीर या परिसरात कोबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचे समोर आले आहे. पण, भारतात हा आजार मानवात संसर्गित झाल्याचे एकही उदाहरण नाही, यामुळे भीती बाळगण्याचे कारण नाही, अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी दिली.

सिंग म्हणाले, मुंबई, बीड गोंदिया, चंद्रपूर परिसरात कावळे तर ठाणे, नागपूर येथे बगळे, पोपट, चिमण्या मरण पावल्याचे आढळले. या सर्व ठिकाणांच्या चाचण्या तपासण्यात येत असून, यातील ठाणे, बीड, लातूर, परभणी भागातील कोंबड्यांना संसर्ग झाल्याचे आढळले. त्या ठिकाणचा १० किलोमीटरचा परिसर कोंबड्यांच्या हस्तांतरणासाठी बंद केला आहे. त्याच ठिकाणच्या १ किलोमीटर परिघातील सर्व कोंबड्या नष्ट करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित ठिकाणचे अधिकार देण्यात आले आहे.

हा आजार झालेल्या कोंबड्या आणि पक्षांपासून तो मानवास संसर्गित झाल्याचे भारतात आढळून आले नाही. २००६ साली बर्ड फ्लू आला होता. तेव्हा मानवांना त्याची लागण झाल्याची मोजकीच प्रकरणे सापडली होती. त्यामुळे असा संसर्ग नाहीच, असेही आयुक्त सिंग यांनी म्हटलं.