पुण्यात मुलींचा जन्मदर घटला ! मनपाच्या आकेडवारीतून माहिती उघड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात मुलींचा जन्मदर घटल्याची धक्कादायक आकडेवारी माहिती अधिकारातून उघड झाली आहे. दर हजार मुलांमागे २३ ने मुलींची संख्या घटली आहे. दरम्यान, राज्यात गर्भलिंग निदान चाचणीला बंदी असताना पुण्यात मुलींच्या जन्मदरात जर घट झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मुलींचा जन्मदर घटल्यामुळे गर्भलिंग निदान चाचणी न करण्याच्या कायद्याची योग्य ती अंमलबजावणी केली जाते की नाही याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांना मिळविलेल्या माहितीनुसार पुण्यात मुलींचा जन्मदारात दर हजारी तब्बल २३ ने घसरण झाली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार २०१६ ते २०१९ या कालावधीत जन्मदर घटल्याचे निष्पन्न झाले आहे. पुणे महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार २०१६ मध्ये दर हजारी मुलींचा जन्मदर ९३२ होता. तर २०१७ मध्ये दरहजारी जन्मदरात सहा ने घट होउन ९२६ एवढा झालाा होता. तर २०१८ मध्ये मुलींचा जन्मदर ९२७ पर्यंत आला. हाच दर २०१९ या एकाच वर्षात ९०४ पर्यंत खाली घसरला आहे. विद्येच्या माहेरघरात मुलींचा जन्मदर खाली घसरल्याने महिला संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे.