‘PUBG’ गेम खेळू न दिल्यानं जन्मदात्या पित्याचे केले ‘तुकडे-तुकडे’

बेळगाव : वृत्तसंस्था – PUBG गेम खेळताना वडिलांनी मोबाईल काढून घेतल्याच्या रागातून मुलाने जन्मदात्या वडिलांचा निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी सकाळी बेळगावमध्ये उघडकीस आली. विकृत मुलाने आपल्या वडिलांचा खून करून त्यांचे शिर धडावेगळे केले, तर उजवा पाय कापून बाजूला ठेवला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी विकृत मुलाला अटक केली आहे.

शंकऱ्याप्पा रेवप्पा कुंभार (वय-61) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर रघुवीर कुंभार (वय-21) असे अटक करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. शंकऱ्याप्पा हे तीन महिन्यापूर्वीच जिल्हा सशस्त्र दलातून निवृत्त झाले होते. रात्री उशिरापर्यंत गेम खेळणाऱ्या रघुवीरच्या हातून त्यांनी मोबाईल काढून घेतला होता. मोबाईल काढून घेतल्यामुळे संतापलेल्या रघुवीरने घरातील विळीने शंकऱ्याप्पा यांचे तीन तुकडे केले. हे कृत्य करताना त्याने आपल्या आईला दुसऱ्या खोलीत कोंडून ठेवले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, रघुवीर हा मेकॅनिकल डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिकतो. त्याला मोबाईलचे प्रंचड वेड असून तो सतत मोबाईल घेऊन बसायचा. त्यामुळे वडिलांनी त्याला अनेकदा समज दिली होती. रविवारी रात्री वडिल घरी आले असता तो मोबाईलमध्ये गेम खेळण्यात मग्न होता. त्यामुळे त्यांनी त्याला फैलावर घेतले. दोघांमध्ये यावरून वाद झाले होते. रात्री त्याने आपल्या आईला दुसऱ्या खोलीत कोंडून वडिलांना धक्काबुक्की करत विळीने त्यांच्या शरिराचे तीन तुकडे केले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची काकती पोलीस ठाण्यात नोंद करून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –