Bitcoin scam : मलई खाणार्‍या उपनिरीक्षकच्या हलगर्जीपणामुळे सुत्रधार अमित भारव्दाज उशीरा गजाआड

पुणे :  एनपी न्युज नेटवर्क

देशभरात गाजलेल्या बीटकॉईन घोटाळयाचा मुख्य सुत्रधार अमित भारव्दाज हा यापुर्वीच गजाआड झाला असता मात्र, पुण्याच्या सायबर सेलमध्ये यापुर्वी कार्यरत असलेल्या एका उपनिरीक्षकाने बीटकॉईनची मलई खाण्यात विशेष ‘प्राविण्य’ दाखविल्याने तो अनेक दिवस फरार राहिला आणि अनेकांचे पैसे बीटकॉईनच्या नादात बुडाले.

बीटकॉईनव्दारे आपली फसवणुक झाली म्हणून एका महिलेने पुण्याच्या सायबर सेलकडे सुमारे सहा-आठ महिन्यांपुर्वी तक्रार केली होती. महिलेची तक्रार सायबर गुन्हे शाखेतील संबंधित उपनिरीक्षकाकडे तपासासाठी गेली. उपनिरीक्षकाला बीटकॉईनची इतंभुत माहिती असल्याने त्याने तक्रार अर्जाकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, अगरवाल नावाच्या व्यक्‍तीने बीटकॉईन संदर्भात सायबर क्राईमकडे तक्रार केली. बीटकॉईनची मलई खाण्यात विशेष ‘प्राविण्य’ असलेल्या उपनिरीक्षकाने संबंधित तक्रारदारासच उलट-सुलट प्रश्‍न विचारून गोत्यात आणले. पोलिस उपनिरीक्षकाने त्याची उलट-तपासणी सुरू केल्यानंतर त्याने संबंधित उपनिरीक्षकास 4 बीटकॉईनची मलई खाण्यास दिली. त्यानंतर संबंधित उपनिरीक्षक मुग गिळून गप्प बसला. काही दिवसात अमित भारव्दाज पुण्यात आला होता. भारव्दाज पुण्यात आला असून तोच बीटकॉईनचा मोठा घोटाळा करीत असल्याची माहिती उपनिरीक्षकाला मिळाली. भेटी-गाठी झाल्यानंतर भारव्दाजने चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी आणि बीन भाडयाच्या खोलीत न जाण्यासाठी उपनिरीक्षकाला बीटकॉईनच्या एका मोठया सेटचीच ऑफर दिली.

मलई खाण्यात ‘प्राविण्य’ असलेल्या उपनिरीक्षकाने अखेर 10 बीटकॉईनवर समाधान मानुन अमित भारव्दाजला रान मोकळे करून दिले. त्यानंतर अमित भारव्दाजने विविध लोकांच्या माध्यमातुन अनेकांना गंडा घातला. पुण्यातील दत्‍तवाडी पोलिस ठाण्यात, रायगड आणि नवी दिल्‍ली येथे बीटकॉईन घोटाळयाप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर मलई खाण्यात ‘प्राविण्य’  दाखविणार्‍या उपनिरीक्षकासह अमित भारव्दाजची भंबेरी उडाली. भारव्दाज भारताबाहेर पसार झाला तर संबंधित उपनिरीक्षक त्याच्या जवळ असलेल्या बीटकॉईनची फिरवाफिरवी करण्यात मग्‍न झाला. दत्‍तवाडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयाचा समांतर तपास सायबर सेलने सुरू केला. त्यावेळी संबंधित उपनिरीक्षकाचे एक-एक कारनामे उघडकीस येण्यास सुरवात झाली. उपनिरीक्षकाने दोषी असणार्‍यांकडून बीटकॉईन घेतल्याचे काही अति वरिष्ठांच्या कानावर गेले. त्यांनी तात्काळ उपनिरीक्षकास बोलावुन घेवुन चौकशी केली. त्यावेळी उपनिरीक्षकाने अति वरिष्ठांसमोर जी काही कबुली दिली ती थक्‍क करणारी होती. मात्र, संबंधित उपनिरीक्षकावर कारवाई करण्यात आली नाही. केवळ त्या उपनिरीक्षकाची सायबर क्राईम सेलमधून उचलबांगडी करण्यात आली.

संबंधित उपनिरीक्षकावर अद्यापही कारवाई झालेली नाही. संबंधिताने मलई स्वरूपात मिळालेल्या बीटकॉईनची विल्हेवाट वेगवेगळया नावाने लावल्याची चर्चा आहे. बीटकॉईन संदर्भात सायबर क्राईम सेलमध्ये पहिली तक्रार आल्यापासुन पोलीसनामाच्या प्रतिनिधीचे या प्रकरणावर बारकाईने लक्ष होते. मात्र, पोलिसांच्या तपासाला कुठलीही बाधा होई नये म्हणून पोलीसनामाने हे वृत्‍त यापुर्वी प्रकाशित केले नाही. अमित भारव्दाजला अटक झाल्यानंतर त्याने पोलिस अधिकार्‍यांसमोर पहिली अठवण काढली ती मलई खाण्यात विशेष ‘प्राविण्य’  दाखविणार्‍या उपनिरीक्षकाचीच.