‘कोरोना’ काळातील संसदीय अहवालावरून राहुल यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संसर्ग, बिहार निवडणूक; तसेच विविध मुद्द्यांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत.
कोरोनाबाबत संसदीय समितीच्या अहवालावरून नुकतेच त्यांनी एक ट्विट केले आहे, त्यामध्ये त्यांनी खोटं बोलून कटू सत्य लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मोदी सरकारच्या अनियोजित लॉकडाउनमुळे लाखो लोकांना गरिबीत ढकलले गेले. नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकले आणि डिजिटल विभाजनामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशीदेखील तडजोड केली, असे म्हणत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. संसदीय समितीचे अध्यक्ष रामगोपाल यादव यांनी हा अहवाल शनिवारी राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांना सोपवला होता. या अहवालात १.३अब्ज लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात आरोग्यावर अतिशय कमी खर्च झाला आहे. आरोग्य व्यवस्थेच्या नाजूकपणामुळे कोरोनाशी मुकाबला करताना अनेक अडचणी आल्याचे म्हटले आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये असलेल्या खाटांची कमतरता आणि उपचारासाठी विशिष्ट दिशानिर्देशांच्या अभावामुळे खासगी रुग्णालयांनी अव्वाच्या सव्वा पैसे उकळले. निश्चित किंमत प्रक्रियेद्वारे अनेक मृत्यू टाळता आले असते, असंदेखील समितीने म्हटलं आहे.

सरकारने सार्वजनिक आरोग्य प्रणालीत गुंतवणूक वाढवण्याची आवश्यकता
सरकारद्वारे कोरोनाचा सामना करण्यासाठी सादर करण्यात आलेला हा पहिलाच अहवाल आहे. सरकारने सार्वजनिक आरोग्य प्रणालीत आपली गुंतवणूक वाढवण्याची आवश्यकता असल्याचेही समितीने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मंदी
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं होतं, त्यामध्ये मोदींच्या धोरणांमुळे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मंदी असल्याचे म्हणले होते. मोदींच्या धोरणांमुळे भारताची ताकद कमकुवत झाली आहे, असे म्हणत त्यांनी रिझर्व्ह बँकेकडून प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीचा संदर्भही दिला. चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत विकास दर (जीडीपी) उणे २३.९टक्क्यांनी खाली आला होता.