कर्जदारांना सरकारकडून दिवाळी गिफ्ट ! 2 कोटी रूपयांच्या लोनवरील व्याजावरचं व्याज केंद्र सरकारनं केलं माफ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   सणाच्या सीजनमध्ये केंद्र सरकारने कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे. कर्ज स्थगित कालावधीत सरकारने ईएमआयबाबत व्याज माफीची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. केंद्र सरकारने बुधवारी 1 मार्च 2020 ते 31 ऑगस्ट 2020 या कालावधीत दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी चक्रवाढ व्याज आणि साधे व्याज यांच्यातील फरकासाठी अतिरिक्त रक्कम म्हणून देय संबंधी मार्गदर्शक तत्त्वांना मंजूरी दिली आहे. म्हणजे केंद्र सरकारने कर्जावरील व्याज माफीच्या मार्गदर्शक सूचनांना मान्यता दिली आहे.

पात्रता निकषानुसार, कर्ज देणार्‍या संस्थांच्या माध्यमातून हा लाभ मिळू शकेल. या योजनेअंतर्गत दोन कोटी रुपयांपर्यंतच्या एमएसएमईसाठी कर्ज, गृह कर्ज, शिक्षण कर्ज, क्रेडिट कार्डची थकबाकी, वाहन कर्जे, ग्राहक वस्तूंचे कर्ज, वैयक्तिक कर्ज यांचा समावेश आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) लागू केलेल्या दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजदरावर व्याज माफी योजनेची लवकर अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

केंद्राने मंजूर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, वित्तीय संस्था आणि बँका स्थगित व्याज आणि साधारण व्याजदरातील फरकाची रक्कम योग्य कर्जदारांच्या कर्ज खात्यात जमा करेल. याचा फायदा रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या मोरेटोरियम योजनेचा अंशतः किंवा पूर्ण फायदा घेतलेल्या कर्जदारांना होईल.

मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता दिल्यानंतर आता बँका आणि वित्तीय संस्था संबंधित कर्जदाराच्या कर्ज खात्यात पैसे टाकतील आणि केंद्र सरकारकडून पैसे घेतील. असे म्हटले जात आहे की, या व्याजावरील व्याज माफ केल्यामुळे तिजोरीवर 6,500 कोटींचा भार पडेल.

You might also like