खुशखबर ! विना परवाना विदेशी बाजारात ‘उत्पादन’ विकू शकतात शेतकरी, जाणून घ्या कशा प्रकारचे घेऊ शकता ‘या’ सुविधेचा लाभ

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   बिहारमधील मुझफ्फरपूर येथील शेतकरी सुनील कुमार यांच्याकडे कोणताही निर्यात परवाना नाही. पण त्याची 750 किलोची लीची लंडनमध्ये पोहोचली. त्याचप्रमाणे आणखी एका शेतकऱ्याची 5 टन लीची जर्मनीला जात आहे. पुढे, परदेशी बाजारामध्ये बर्‍याच शेतकर्‍यांची उत्पादने विकण्याचा प्रयत्न सुरू आहे. आयटी मंत्रालयाच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) च्या माध्यमातून हा उपक्रम केला जात आहे. या संपूर्ण उपक्रमात शेतकर्‍यांना आपले उत्पादन विकायला गावाबाहेर जाण्याची गरज नाही. तसेच वस्तू विकल्याबरोबर संपूर्ण किंमत शेतकर्‍याच्या खात्यावर येते.

काय आहे प्रक्रिया

सीएससीच्या ई-मार्ट पोर्टलवर शेतकऱ्यांनी स्वत: ची नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी दरम्यान, शेतकर्‍यांना त्यांचे उत्पादन काय आहे, त्याचा आकार काय आहे आणि कोणत्या किंमतीला ते विकायचे आहे, हे सांगावे लागेल. पोर्टलवर, शेतकर्‍यांना त्यांची जमीन आणि शेतकरी असल्याचा पुरावा याबद्दल माहिती द्यावी लागेल. बँक खाते असणे आवश्यक आहे. पॅनकार्ड नसले तरी नोंदणी केली जाईल. गाव पातळीवरील उद्योजक (व्हीएलई) नोंदणीच्या कामात शेतकऱ्यांना मदत करतात. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी तयार केलेल्या उत्पादनांची संपूर्ण माहिती दिल्यानंतर ही माहिती व्यापारी आणि कृषी निर्यातदारांना सामायिक केली जाते.

सीएससीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश त्यागी म्हणाले की, ई-मार्ट प्लॅटफॉर्मवर व्यापारी आणि कृषी निर्यातदारही आहेत, परंतु त्यांना केवळ शेतकर्‍याचे उत्पादन दर्शविले जाते आणि मग ते बोली लावतात. व्यापारी आणि निर्यातदारांना शेतकऱ्याला किती किंमत हवी आहे, हे ठाऊक नसते. त्यागी म्हणाले की पुण्यातील टोमॅटो उत्पादक दत्तात्रेय बडबडे यांना टोमॅटो 10 रुपये किलो द्यायचा होता आणि त्याला प्रति किलो 10.50 रुपये किंमत मिळाली.

बोली लावताच निम्मी किंमत खात्यावर

उत्पादकांची बोली लागताच व्यापारी आणि निर्यातदारांना सीएससीशी जोडलेल्या खात्यात निम्मी किंमत जमा करावी लागेल. त्यानंतर व्यापारी आपल्या कर्मचार्‍यास मालाचे फिजिकल व्हेरिफिकेशन करण्यासाठी स्पॉटवर पाठवतो. माल उचलताच व्यापाराना पूर्ण पैसे द्यावे लागतात आणि दिलेल्या खात्यात शेतकऱ्याला किंमत दिली जाते. या संपूर्ण प्रक्रियेत, दलालांना दूर ठेवण्यासाठी, त्यांचा शेतकरी असल्याचा पुरावा शेतकऱ्यांकडून मागविला जातो.

गेल्या महिन्यात सीएससीवर ई-मार्ट लॉन्च करण्यात आले आहे. सीएससी व्हीएलईंना एक निश्चित कमिशन देते जे शेतक-यांना नोंदणीमध्ये मदत करतात. गेल्या एक महिन्यादरम्यान, ई-मार्ट प्लॅटफॉर्मवर नाशवंत कृषी उत्पादनांची सर्वाधिक विक्री झाली आहे.