एअर कंडिशनर्सच्या आयातीवर सरकारनं घातली बंदी, देशांतर्गत उत्पादन वाढीसाठी उचलली पावले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारने गुरुवारी रेफ्रिजंट्ससह एअर कंडिशनर्सच्या आयातीवर बंदी घातली. देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि अनावश्यक वस्तूंची आयात कमी करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने एका अधिसूचनेत म्हटले आहे की, रेफ्रिजरेट्ससह एअर कंडिशनर्सच्या आयातीबाबत धोरणात बदल करण्यात आला आहे. याअंतर्गत, ते मुक्त श्रेणीतून काढून टाकून प्रतिबंधात्मक यादीमध्ये ठेवले आहे.

देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी आणि अनावश्यक वस्तूंची आयात कमी करण्यासाठी सरकार पावले उचलत आहे. तत्पूर्वी, जूनमध्ये सरकारने कार, बस आणि मोटारसायकलींमध्ये वापरल्या जाणार्‍या नवीन न्यूमॅटिक टायरच्या आयातीवर बंदी घातली होती.

दरम्यान, देशातील एसी बाजारपेठ 5-6 अब्ज डॉलर्सची आहे, त्यातील बहुतांश आयात केली जाते. एसीसाठी भारत आपल्या आवश्यकतेपैकी 28 टक्के आयात चीनकडून करतो.