N-95 मास्क झाला 47 टक्क्यांपर्यंत ‘स्वस्त’, 150 ते 300 रुपयांना विकला जात होता

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  एन-95 मास्कचे दर 47 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहेत. सरकारच्या हस्तक्षेपानंतर हे बनविणार्‍या प्रमुख कंपन्यांनी आणि आयातदारांनी याचे दर कमी केले आहेत. राष्ट्रीय औषध मुल्य नियामक प्राधिकरणाने(एनपीपीए) देशातील प्रमुख उत्पादकांनी हे स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलली, ज्यानंतर याच्या किंमती खाली आल्या आहेत. बाजारात यापूर्वी 1 पिस एन-95 मास्क 150 से 300 रुपयांना विकला जात होता. एनपीपीएच्या सूचनेनंतर त्याची किंमत कमी झाली आहे.

रसायन आणि खते मंत्रालयाने म्हटले की, एन-95 मास्कच्या जास्त किंमती कमी करण्यासाठी एनपीपीएने पावले उचलली आहेत. प्राधिकरणाने 21 मे 2020 ला सर्व उत्पादक आणि पुरवठादारांशी चर्चा करून एन-95 मास्कच्या गैर-सरकारी खरेदीसाठीचे मूल्य समान आणि योग्य ठेवण्यास सांगितले आहे.

एनपीपीएने मुंबई उच्च न्यायालयासमोर म्हटले की, देशात एन-95 मास्कची मागणी आणि पुरवठा यातील अंतर पाहून उत्पादक, आयातदार, आणि पुरवठादार यांना स्वेच्छेने दर कमी करण्याचा सल्ला दिला आहे. उच्च न्यायालयात कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी एन-95 मास्कचे दर कमी करण्यासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी दरम्यान प्राधिकरणाने हे सांगितले.

वक्तव्यानुसार, एन-95 मास्कच्या दरात 47 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. सरकारने एन-95 मास्कला अनिवार्य वस्तू अधिसूचित केले आहे. यास आवश्यक वस्तू अधिनियमांतर्गत ठेवले आहे.