‘कोरोना’मुळं व्यवसायाचं नुकसान होत असल्यानं ‘Swiggy’ नं घेतला 1,100 ‘कर्मचार्‍यांना’ कामावरून काढण्याचा ‘निर्णय’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी (Swiggy) ने पुढील काही दिवसांत आपल्या 1,100 कर्मचार्‍यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने कोरोना विषाणूमुळे आपल्या व्यवसायात झालेले नुकसान पाहून हा निर्णय घेतला आहे. स्विगीने सोमवारी याबाबत घोषणा केली आहे. स्वीगीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहर्ष मजेटी यांनी सोमवारी आपल्या कर्मचार्‍यांना सांगितले की, ‘आपल्याला एका कठीण परिस्थितीतून जावे लागत आहे. फूड डिलिव्हरी व्यवसायावर याचा गंभीर परिणाम झाला आहे. हे काही काळापर्यंत राहील. भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्हाला खर्च कमी करण्याची आवश्यकता आहे. आज कंपनीसाठी एक दुःखद दिवस आहे.’

मजेटी म्हणाले की कोरोनामुळे सर्वात जास्त प्रभावित कंपनीचा क्लाऊड किचन व्ययसाय झाला आहे. ते म्हणाले की, कंपनी तो व्यवसाय बंद करीत आहे, ज्यात पूर्णपणे अस्थिरता येत आहे किंवा पुढील 18 महिन्यांकरिता त्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर, सर्व बाधित कर्मचार्‍यांना किमान तीन महिन्यांचे वेतन दिले जाईल असेही मजेटी म्हणाले.

नुकतीच ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोनेही आपल्या कर्मचाऱ्यांना कमी करण्याची घोषणा केली आहे. झोमॅटोने आपल्या 13 टक्के कर्मचार्‍यांना नोकरीवरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच उर्वरित कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये 50 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वेतनात ही कपात जून महिन्यापासून होणार आहे. कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल म्हणाले होते की भविष्यात कंपनीच्या सर्व कर्मचार्‍यांसाठी यापुढे पुरेसे काम उपलब्ध होणार नाही आणि म्हणूनच कंपनीला येणाऱ्या वाईट काळासाठी स्वतः तयार राहण्याची गरज आहे.

महत्त्वाचे म्हणजे देशव्यापी लॉकडाऊन चौथ्या टप्प्यात 31 मे पर्यंत वाढविण्यात आले आहे. तथापि या टप्प्यात व्यवसायांना अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 25 मार्चपासून देशव्यापी लॉकडाउन लागू आहे. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे होणारे नुकसान लक्षात घेता सरकारने 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे.