ग्राहकांना दिलासा ! YES बँकेनं ट्विट करून दिली ‘ही’ महत्वाची माहिती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – येस बँकेच्या ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. रात्री उशिरा येस बँकेने ट्विटरद्वारे म्हटले की, आता त्यांचे ग्राहक येस बँक किंवा इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून आपल्या डेबिट कार्डद्वारे पैसे काढू शकतात. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आरबीआयने येस बँकेला मोरेटोरियमच्या अंतर्गत ठेवले असून 3 एप्रिलपर्यंत जास्तीत जास्त पैसे काढण्याची मर्यादा 50,000 रुपये निश्चित केली आहे. गुरुवारी येस बँकेचे बोर्डही बरखास्त करण्यात आले.

आरबीआयच्या या अनपेक्षित निर्णयामुळे येस बँक ग्राहकांना बरीच अडचणी येत आहेत. एटीएमसमोर ठिकठिकाणी लांबलचक रांगा दिसत आहेत. महत्वाचे म्हणजे बहुतेक एटीएममध्ये पैसे देखील नाहीत. येस बँकेने ट्विट केले की, ‘आता तुम्ही येस बँक डेबिट कार्डाद्वारे येस बँक व इतर बँकांच्या एटीएममधून पैसे काढू शकता. तुमच्या धैर्याबद्दल धन्यवाद. ‘

नेट बँकिंग सेवेतील अडचणींमुळेही येस बँकेच्या ग्राहकांना समस्या भेडसावत होती. काही ग्राहकांनी त्यांची क्रेडिट कार्डही काम करत नसल्याची तक्रार केली. येस बँकेच्या दिल्लीतील एका ग्राहकाने सांगितले की, ‘इंटरनेट बँकिंग काम करत नाही. तसेच क्रेडिट कार्डचे कामही बंद झाले आहे. दरम्यान, मी चेकद्वारे पैसे काढू शकलो.

दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा एनफोर्समेंट डायरेक्टरेटने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणी येस बँकेचे माजी अध्यक्ष आणि संस्थापक राणा कपूर यांना अटक केली. 30 तासांच्या सखोल चौकशीनंतर कपूर यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यान्वये अटक करण्यात आली.