आम्ही ‘त्याच’ पक्षाला पाठिंबा देणार ; BJDचा खुलासा

भुवनेश्वर : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीनंतर आता एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली असून यात भाजपला सर्वात जास्त जागा मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर आता छोटे प्रादेशिक पक्ष कुणाला पाठिंबा देणार यावरून चर्चा रंगताना दिसत आहे. जर सत्ताधारी भाजपाला सरकार स्थापन करण्यात काही जागा कमी पडल्या तर प्रादेशिक पक्षांची भूमीका फार महत्वाची राहील. यानंतर आता ओडिशातील प्रमुख पक्ष बीजू जनता दलाने (BJD) देखील निकालानंतर कुणाला पाठिंबा देणार याबद्दल स्पष्ट संकेत दिले आहेत.

त्यामुळे जो पक्ष सत्ता स्थापन करण्यासाठी दावा करेल त्यांना आपण पाठिंबा देऊ, असेच जवळपास बीजू जनता दलाने संकेत दिले आहेत. त्यामुळे जर NDA केंद्रात सरकार स्थापन करणार असेल तर बीजू जनता दल त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता नाकारता येत नाही. याविषयी अधिक बोलताना बीजेडीचे वरिष्ठ प्रवक्ते अमर पटनायक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आमच्या ‘स्पेशल कॅटिगरी’सारख्या समस्या जो पक्ष समजून घेईल, आम्ही त्याच्यासोबत राहू.”जो पक्ष केंद्रात सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत असेल आपण त्यांना पाठिंबा देऊ असेदेखील ते यावेळी म्हणाले.

याआधी देखील जेव्हा ओडिशात चक्रीवादळ आले होते त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली होती. त्याचप्रमाणे या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देखील दोन्ही पक्षांनी एकमेकांवर मोठ्या प्रमाणात टीका करणे टाळले होते. त्यामुळे आता प्रत्यक्ष २३ तारखेनंतर काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.