मुक्ताईनगर पंचायतीत एकनाथ खडसे गटाला खिंडार; 6 नगरसेवक शिवसेनेत

मुक्ताईनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  येथील नगरपंचायतीमधील भाजपच्या सहा नगरसेवकांनी मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे एकनाथ खडसे गटाला धक्का असून अन्य चार नगरसेवकही हातात शिवबंधन बांधणार असल्याचे समजते. दरम्यान, या घडामोडींमुळे जळगाव महानगरपालिके पाठोपाठ मुक्ताईनगर नगरपंचायतमध्येही शिवसेनेचा भगवा फडकणार आहे. बुधवारी झालेल्या या प्रवेशावेळी यावेळी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

२०१८ मध्ये मुक्ताईनगर नगरपंचायत अस्तित्वात आली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत एकनाथ खडसे गटाचे (भाजप) १७ पैकी १३ नगरसेवक निवडून आले होते. तर एका अपक्षाने खडसे गटाला पाठिंबा दिल्याने हि संख्या १४ झाली होती. तर शिवसेनेचे तीन नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये भाजपा गटनेते पियुष महाजन, उपगटनेते संतोष कोळी, माजी सभापती मुकेश वानखेडे त्याच बरोबर बिल्किसबी अमानुल्ला खान, शबाना बी अब्दुल आरिफ , नुसरतबी मेहबूब खान या तीन नगरसेविकांचा समावेश आहे. यावेळी या तीन नगरसेविकांचे पती मुंबईत उपस्थित होते.