शिवसेनेची ‘ती’ खेळी हाणून पाडण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते आक्रमक !

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात युतीत 'बदला'चे वारे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – येत्या विधानसभा निवडणुकीला आता जेमतेम दोन-तीन  महिन्यांचा कालावधी राहिलेला असताना शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेनेमध्येच आता ‘सामना’ रंगला आहे. प्रबळ उमेदवार नसतानाही एका व्यक्तीला ‘आयात’ करून, ज्याचा समाजकारणच नाही तर राजकारणाशी काहीएक संबंध नाही, असा उमेदवार ‘डील’ करून लादण्याच्या शिवसेनेच्या खेळीलाच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेऊन ‘बदला’ घेण्याचा पवित्रा घेतल्याने राजकीय वर्तुळात हा मतदारसंघ गाजण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्याने भाजपचे वर्चस्व वाढले आहे. सद्यस्थितीत आठही आमदार हे भाजपचेच आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत युतीत कुणाला कोणते मतदारसंघ याचा फैसला हा वादग्रस्त ठरणार आहे. मुळात भाजपाची ताकद वाढलेली असताना आणि आठही आमदार भाजपचेच असल्याने शिवसेनेला अपेक्षित मतदारसंघ कोणते मिळतील हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. असे असताना शिवसेनेच्या गोटातून ‘शिवाजीनगर’मध्ये  एका नव्या चेहऱ्याला रिंगणात उतरविण्याची खेळी सुरु आहे. त्यात काहींची ‘डील’ असल्याचे बोलले जात आहे. तसेच त्याला भाजपमधील एका विद्यमान दिग्गज व्यक्तिमत्वाची साथ असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे या मतदारसंघात वातावरण पेटले आहे.

भाजपच्या वर्तुळातून शिवसेनेकडून ‘आयात’ करण्यात येणाऱ्या नव्या चेहऱ्याला आक्षेप घेतला जात असून समाजकारण आणि राजकारणाशी काहीएक संबंध आणि योगदान नसताना लवकरच निवृत्त होणाऱ्या या अधिकाऱ्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यामागे कोणते ‘गणित’ असा जाबही विचारला जात आहे. शिवाय गत विधानसभा निवडणुकीतील मतांच्या समीकरणांचा आधार घेत ‘शिवाजीनगर’वर भाजपने आतापासून दावा ठोकला आहे मात्र विद्यमान आमदारांविरोधातही भाजपमधील अनेकांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या ‘आयात’ करण्याच्या ‘गणिता’त कोण भागीदार याचीही चर्चा भाजपच्या वर्तुळात रंगत आहे.

विशेष म्हणजे सोशल मीडियावर आता खुलेआम तसे संदेशही फिरत तर आहेत शिवाय घराणेशाही कदापी नको असा पवित्राही घेतला जात आहे. शिवसेनेच्या या खेळीला उलटवून टाकण्यासाठी भाजपमधून इच्छुक असलेल्यांनी एकीची मोट बांधली आहे.त्यासाठी गत विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांची टक्केवारीही मांडली जात आहे. मराठा समाजाचे प्राबल्य या मतदारसंघात असल्याकडेही लक्ष वेधले जात आहे. ३८ टक्के मराठा समाजाचे मतदार असल्याने भाजपमधून डझनभर इच्छुक आजमितीस ‘आमदारकी’साठी सज्ज झाली आहेत.माजी खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे ,शाम सातपुते ,वसंत उर्फ बाळासाहेब अमराळे ही नावे इच्छुकांमध्ये अग्रेसर असली तरी नात्यागोत्यांचे समीकरण या मतदारसंघात प्रभावी ठरणार आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून या मतदारसंघावर होणारा दावा खोडून काढण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत . त्यासाठी सोशल मीडियाच्या व्यासपीठाचा आधार घेऊन वातावरण निर्मितीही  सुरु झाली आहे.या मतदारसंघावर दावा ठोकणाऱ्या शिवसेनेकडे मागच्या वेळेप्रमाणे यंदाही  प्रबळ उमेदवारच नाही. त्यामुळे बाहेरचा उमेदवार ‘आयात’ करुन काहींचा अर्थकारणाचा डाव असल्याचा आरोपही आता भाजपच्या वर्तुळातून होत आहे.त्यात स्वीकृत सदस्यपदी काँग्रेस – राष्ट्रवादीमधील ‘आयात’ व्यक्तींची वर्णी लागल्याने विद्यमान आमदारांविरोधात असंतोषाचा भडका उडाला आहे. इतकेच काय आमदार विजय काळे हटाव ही मोहीमही भाजपमधील काहींनी खुलेआम सुरु केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात युतीत ‘बदला ‘ घेण्याचेच राजकारण पेटणार  अशी चिन्हे आहेत.

आरोग्य विषयक वृत्त –

तुमचे आरोग्य कसे आहे ? याचे उत्तर देईल तुमची जीभ

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा “पायलेट्स एक्सरसाइज”

शरीराचा गंध सांगेल तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलु

‘संत्रे’ आरोग्य आणि त्वचेसाठी अत्यंत लाभदायक फळ

लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय