विधानपरिषद निवडणूक : प्रचाराच्या तोफा थंडवल्या, महाआघाडी सरकार विरुद्ध भाजप ‘सामना’ रंगणार

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात पहिल्यांदाच विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळत आहे. वास्तविक यापूर्वीही चुरस होती पण मात्र यावेळी महाआघाडी सरकार विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडल्यानंतर प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या. मतदान १ डिसेंबरला तर मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपने संग्राम देशमुख यांना मैदानात उतरविले आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीने अरुण लाड यांना संधी दिली. सध्या बंडखोरीचे चित्र दिसात नाही त्यामुळे हि निवडणूक थेट भाजप विरुद्ध महाआघाडी अशीच होणार आहे. संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे, मनसेच्या रुपाली पाटील हेही मैदानात आहेत. या मतदारसंघात चुरशीची लढत होत असून आघाडी आणि भाजप नेत्यांनी ताकद पणाला लावली आहे. स्वत: शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह जयंत पाटील आदींनी मतदारसंघ पिंजून काढला. तर भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली. रविवार हा प्रचाराचा अंतिम दिवस असल्याने प्रत्येक उमेदवाराने आपल्या प्रचारासाठी जोर लावला होता त्याचरोबर नेते मंडळीही पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले होते.

पुणे शिक्षक मतदार संघासाठी महाविकास आघाडीत हि राष्ट्र्रवादीकडे असून राष्ट्रवादीने कोल्हापूरचे जयंत आसगावकर यांना मैदानात उतरवले आहे. तर भाजपकडून सोलापूरचे जितेंद्र पवार उभे आहेत. विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे हि निवडणूक देखील रंगतदार होणार आहे.

दरमयान, महाविकास आघाडीकडून अमरावती मतदारसंघात विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे तर भाजपकडून नितीन धांडे निवडणूक लढवित आहेत. या शिवाय, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रकाश काळबांडे, शिक्षक महासंघाचे शेखर भोयर हेही आपले नशिब आजमावत आहेत.

मराठवाड्याकडे लक्ष
मराठवाडा पदवीधरसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण तर भाजपकडून शिरीष बोराळकर मैदानात आहेत. त्याचबरोबर स्व. गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक रमेश पोकळे यांनी बंडखोरी केली आहे त्यामुळे या मतदारसंघात चुरशीची लढत होत आहे. सतीश चव्हाण यांच्यासाठी महाआघाडीने ताकदपणाला लावली आहे. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी प्रचार सभाही घेतल्या आहेत तर दुसरीकडे यांच्यासाठी चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे पंकजा मुंडे आदी नेत्यांनी प्रचार केला.

नागपुरात बहुरंगी लढत ….
नागपूर पदवीधर मतदार संघ हा भाजपचा पारंपारिक मतदारसंघ असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर पहिल्यांदाच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. या मतदार संघात भाजपने विद्यमान आमदार अनिल सोले यांचा पत्ता कट करून महापौर संदीप जोशी यांना मैदानात उतरविले. तर कॉंग्रेसने एड. अभिजीत वंजारी यांना उमेदवारी दिली. या दोघांशिवाय, वंचित बहुजन आघाडीचे राहुल वानखेडे, विदर्भवादी चळवळीतील नितीन रोंगे, अपक्ष प्रा. प्रशांत डेकाटे, अतुलकुमार खोब्रागडे हेही मैदानात आहेत. त्यामुळे या मतदारसंघात लढत बहुरंगी असली तरी खरा सामना भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असाच आहे