भाजप आणि महादेव जानकर यांनी धनगर समाजाची फसवणूक केली : बापूराव सोलनकर

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय जनता पक्ष आणि महादेव जानकर यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा भावनिक बनवून ते सत्तेवर आले. निवडणुकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते परंतु सत्तेवर आल्यानंतर राज्यसरकार असो अथवा महादेव जानकर असोत या दोघांनी धनगर आरक्षणाला बगल दिली व गेली साडे चार वर्षे समाजाची दिशाभूल केली.

धनगर समाज या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास बापुराब सोलनकर यांनी व्यक्त केला ते रासपचे बारामती लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष होते त्यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेमध्ये प्रवेश केला आहे.

पुढे बोलताना त्यांनी बारामतीच्या विकासामध्ये भाजप मंत्र्यांचे कोणतेही योगदान नाही पण ते बारामती जिंकण्याची भाषा करत आहेत. त्यांच्या अश्वासनांना बारामतीची जनता आता भूलणार नाही. भाजप ने रासप चे अध्यक्ष महादेव जानकर यांना एकही जागा न देता उलट रासप च्याच आमदाराच्या पत्नीला लोकसभेचे तिकिट देऊन रासप ला संपवण्याचे कटकारस्थान केले. महादेव जानकर यांच्या मनात नसताना सुद्धा भाजप चा प्रचार करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे. महादेव जानकर हे धनगर समाजा मुळे मंत्री झाले आणि धनगर समाजाला विसरले आहेत.

जाणकरांनी धनगर, बहुजन समाजातील तरुणांचा विश्वासघात केला अशी टिका बापूराव सोलनकर यांनी भाजप आणि जानकर यांच्यावर केली आहे. बारामती लोकसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ, बारामती तालुक्यातील, ढाकाळे, पळशी, मासाळवाडी, खंडोबावाडी, गरदडवाडी येथील गावातील मतदारांच्या गाटीभेटी घेतल्या त्यावेळी ते बोलत होते. सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा मतदार संघातून मोठ्या फरकाने विजयी होईल असा विश्वास यावेळी सोलनकर यांनी व्यक्त केला.