Pune News : पुणे महापालिकेत भाजप अन् राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले, जय श्रीराम, अजितदादांच्या घोषणांनी संपुर्ण सभागृह दणाणले (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुणे महानगर पालिकेमध्ये भामा आसखेड योजनेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात गोंधळ पहायला मिळाला. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सुरु केलेल्या घोषणाबाजीला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले. या सर्व प्रकारामुळे भामा आसखेड योजनेच्या उद्घाटन कार्यकमास कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने गालबोट लागले.

शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने भामा आसखेड पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे. आठ वर्षानंतर या योजनेचे काम पूर्ण झाले आहे. या योजनेचा लोकार्पण सोहळा आज महापालिकेच्या सभागृहात पार पडला. या योजनेच्या कामावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेयवाद सुरु झाला. गटनेत्यांच्या बैठकीत अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा प्रस्ताव मंजुर केल्यानंतर पुन्हा भाजपने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा प्रस्ताव देऊन तो मंजूर करण्यात आला. यातून मार्ग काढत दोन्ही नेत्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थितीत आज या योजनेचे लोकार्पणाचा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. या कामावरून श्रेयवादाचे पडसाद यावेळी उमटले. दोन्ही पक्षांकडून पालिका परिसरात मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी करण्यात आली. त्यातच दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

अजित पवार सभागृहाच्या पायऱ्या चढत असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुण्याची ताकद, गिरीश बापट, मोदी मोदी, देवेंद्र फडणवीस तुम आगे बढो अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्याचवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच वादा अजित दादा अशी घोषणाबाजी सुरु केली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी हस्तक्षेप करुन कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. सभागृहात कार्यक्रम सुरु झाल्यानंतर देखील बाहेर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत होते.