भाजपचे अनिल गोटे यांचा आमदारकीचा राजीनामा

अपक्ष म्हणून अर्ज भरणार

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या अनिल गोटे यांनी अखेर आज आमदारकीसह पक्ष सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे अनिल गोटे उद्या लोकसभेसाठी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार आहेत.

यावेळी बोलताना गोटे यांनी संगितले की, “पक्षातील राजकारणाचा कंटाळा आला आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा देखील केली. मात्र, त्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही “असे गोटे यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी देखील गोटे यांनी अनेकवेळा पक्षासंदर्भात नाराजी जाहीररीत्या व्यक्त केली आहे. आमदार गोटे यांनी आज अखेर प्रदेशाध्यक्षांकडे आपला राजीनामा पाठवला आहे.

गोटेंनी घेतली होती पवारांची भेट

धुळे महापालिका निवडणुकीपासून नाराज असलेल्या गोटे यांची भाजप खासदाराविरोधात निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर अनिल गोटे वैर विसरुन शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. भेटीनंतर अनिल गोटे म्हणाले की, ‘राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो. भाजपच्या उमेदवाराला पाडणे हेच माझे एकमेव ध्येय आहे. त्यासाठीच मी शरद पवारांची भेट घेतली आहे.’ असे त्यांनी स्पष्ट केले होते.

अनिल गोटे आणि सुभाष भामरे वाद –

धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे आणि आमदार अनिल गोटे यांच्यातला वाद सर्वश्रुतच आहे. काही महिन्यापूर्वीच धुळे महापालिका निवडणूक झाली. यावेळी अनिल गोटे यांनी भाजपविरोधात भूमिका घेतली होती. भाजपचेच असलेल्या अनिल गोटे यांनी गिरीश महाजन आणि केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांना कडाडून विरोध केला होता. तसेच त्यांची सभाही उधळून लावली होती. अनिल गोटे यांचे मंत्री सुभाष भामरे यांच्याशी वाद सुरु होते. भाजपकडून दगाफटका झाल्याचा आरोप करत धुळे मनपा निवडणुकीपूर्वीच अनिल गोटे यांनी नव्या पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली होती.