उदयनराजेंची मनधरणी फिस्कटली, भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरु केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच शिवसेना आणि भाजपाने युतीची घोषणा केली आहे. मात्र आता कोण कोणत्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान मागील काही काळापासून साताऱ्यात एकहाती सत्ता स्थापन करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांना आगामी लोकसभा निवडणुकीत आवाहन देण्यासाठी भाजपने माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांचे नाव समोर केले असल्याचे वृत्त आले आहे.

हेही वाचा – पवार – शिंदे भेटीने राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण 

मागील काही काळापासून साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणुकीत एकहाती सत्ता स्थापन केली आहे. मात्र यावेळी साताऱ्यामध्ये माथाडी कामगारांची संख्या जास्त आहे. यामुळे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिल्यास त्याचा इतर मतदारसंघांमध्येही फायदा होऊ शकतो. असा विचार करत खासदार उदयनराजे भोसले यांना आगामी लोकसभा निवडणुकीत आवाहन देण्यासाठी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना उमेदवारी देण्याचा विचार भाजपामध्ये सुरु आहे. इतकेच नव्हे तर, भाजपकडून माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या नावाची चाचपणी सुरु आहे.

विशेष म्हणजे, उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असले तरी त्यांचे पक्ष अध्यक्ष शरद पवार सोडले तर पक्षातील एकही नेत्याशी त्यांचे जमत नाही. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ते पक्षावर नाराज होते. दरम्यान, भाजपतर्फे त्यांना राष्ट्रवादी सोडून भाजपा मध्ये प्रवेश करावा यासाठी प्रयत्नही करण्यात आले होते. याचदरम्यान उदयनराजेंनी उघडपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही स्तुती केली होती. तसेच मुंबईमध्ये भेटही घेतली होती. या पाश्वभुमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची वेळोवेळी भेट घेत मनधरणीही केली होती. अखेर गेल्या काही दिवसांपूर्वीच उदयनराजेंची साताऱ्यात शरद पवार यांनी भेट घेत खासदारकीची जागा पक्की केली होती. यानंतर उदयनराजेंनी पक्षाच्या प्रचारासाठी अन्य मतदासंघांमध्येही यावे अशी अपेक्षाही पवारांनी व्यक्त केली होती. साताऱ्यातून उदयनराजेंना विरोध असल्यामुळे त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार का नाही, याबाबत चर्चा होती. मात्र, पवार-भोसले भेटीनंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

साताऱ्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात उदयनराजेंचा चाहता वर्ग आहे. विशेषतः त्यांच्या वेगवेगळ्या स्टाईलचे जनताच नव्हे तर राजकीय पक्षातही चाहते आहे. आणि विशेष म्हणजे गेल्या कित्तेक काळापासून त्यांनी एकहाती सत्ता स्थापन केली आहे. यामुळे त्यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक कोण लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.