भाजपच्या पहिल्या यादीतून आडवाणींचा पत्ता कट

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली यादी आज जाहीर केली. या यादीत १८२ उमेदवारांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री आणि भजपचे नेते जे.पी. नड्डा यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. परंतु, भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची नावे जाहीर करण्यात आली नाहीत.

लालकृष्ण आडवाणी यांचा बालेकिल्ला असणाऱ्या गांधीनगर मतदारसंघातून भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक आडवाणी लढवणार आहेत की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही वाराणसीमधून निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत. नितीन गडकरी, राजनाथ सिंह यासारख्या भाजपाच्या बड्या नेत्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

भाजपकडून यंदा पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचा पत्ता कट करण्यत आला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ मंडळींची रवानगी संसदीय मंडळात करण्यात आली होती. तेव्हापासून हे नेते पक्षातून बाजूला पडले होते.

याशिवाय, भाजपच्या अन्य ज्येष्ठ नेत्यांनीही यापूर्वीच लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सुषमा स्वराज, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री बी.एस. कोशियारी, बीसी खांडुरी, कलराज मिश्रा आणि सुमित्रा महाजन यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केले आहे.

पहिल्या यादीत एकूण 20 राज्यातील काही उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भाजपाच्या पहिल्या यादीत नितीन गडकरी (नागपूर), राजनाथ सिंह (लखनऊ), डॉ. सत्यपाल सिंह (बागपत), हेमा मालिनी (मथुरा), व्ही. के. सिंग (गाझियाबाद), साक्षी महाराज (उन्नाव), स्मृती इराणी (अमेठी) या आणखी काही प्रमुख नावांचा समावेश आहे.